सातारा : सातारा नगरपरिषदेकडून सध्या शहरात धडक अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेमुळे रस्ते मोकळे होत असल्याबद्दल नागरिकांमधून कौतुक होत असले, तरी या कारवाईत दुटप्पी भूमिका घेतली जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. एकीकडे बोगदा परिसर आणि राधिका रोड येथील गरीब व सर्वसामान्य टपरीधारकांवर तत्परतेने कारवाई केली जात असताना, पोवई नाका येथील ‘हॉटेल वसंत भोजनालय’वर कारवाई करण्यास मात्र टाळाटाळ केली जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.
याप्रकरणी शिवसेना शहर संघटक किरण कैलास कांबळे यांनी सातारा नगरपरिषदेच्या नियोजन सभापती अशोक शेडगे यांना निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. नगरपरिषदेने हॉटेल वसंत भोजनालय प्रशासनाला नोटीस बजावून 7 दिवसांत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे तसेच अनधिकृत बांधकाम असल्यास ते हटवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. मात्र, 15 दिवस उलटूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. कायदा व नियम हे सर्वांसाठी समान असले पाहिजेत, त्यामुळे प्रशासनाने स्वतः बजावलेल्या नोटीसीची तात्काळ अंमलबजावणी करून संबंधितांवर नियमानुकूल कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शहरात सर्वांसाठी एकच कायदा आणि एकच निकष लागू व्हावा, हीच शिवसेनेची भूमिका असून नगरपरिषदेने या प्रकरणी दुर्लक्ष केल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही किरण कांबळे यांनी प्रशासनाला दिला आहे.