सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जावळी तालुक्यातील विविध विकास सेवा सोसायट्यांचे ठराव कायदेशीर आणि पूर्णपणे लोकशाही मार्गानेच झाले असून विरोधकांनी जनतेचा बुद्धिभेद करू नये, असा थेट इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला आहे.
जावळी तालुक्यात सोसायटी ठरावांवरून आमदार शशिकांत शिंदे गट आणि ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले गट यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. ठराव आपल्या बाजूने वळवण्यासाठी भोसले गटाकडून दबाव आणि हस्तक्षेपाचा वापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. हे सर्व आरोप फेटाळून लावताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, आम्ही कधीही दादागिरीचे राजकारण केले नाही. सोसायटी संचालकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता स्वेच्छेने निर्णय घेतले असून जनता आणि संचालक आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. विरोधकांनी वस्तुस्थितीचा स्वीकार करावा, निव्वळ राजकीय हेतूने संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न थांबवावेत.
जिल्हा बँकेच्या आगामी सत्ता समीकरणांमध्ये जावळीतील सोसायट्यांचे ठराव अत्यंत निर्णायक मानले जातात. बहुतांश सोसायट्यांचे ठराव आपल्या बाजूने झाल्याचा दावा भोसले गटाकडून केला जात असून, यामुळे तालुक्यात त्यांची पकड मजबूत असल्याचे स्पष्ट होत आहे. यावर बोलताना शिवेंद्रसिंहराजे यांनी विरोधकांना राजकारणाची पातळी राखण्याचे आवाहन केले. निवडणुकीच्या तोंडावर अपप्रचार करणाऱ्यांना जनतेच्या पाठबळावर योग्य उत्तर दिले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या आरोप-प्रत्यारोपांमुळे आता ठरावांची अंतिम अधिकृत वैधता आणि आगामी निवडणूक प्रक्रियेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.