आरक्षण रद्द करण्याची मागणी करणारे राष्ट्रद्रोही; कठोर कारवाई करण्याची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी

by Team Satara Today | published on : 17 August 2026


नागपूर : अनुसूचित जाती आणि जमाती यांना संविधानाने दिलेले आरक्षण रद्द करण्याची मागणी करण्याचा अधिकार कुणालाही नाही. हे संवैधानिक आरक्षण रद्द करण्याची मागणी करणारे राष्ट्रद्रोही असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केली. 

सोमवारी ते नागपुरात पत्रपरिषदेत बोलत होते. आठवले म्हणाले, राजकीय आरक्षण हे दहा वर्षाचे आहे. त्यामुळे हे आरक्षण वाढविण्याबाबत संसदेत विधेयक आणण्यात येते. परंतु शैक्षणिक व नोकरीत आरक्षण हे घटनात्मक आहे. ते रद्द करण्याची भाषा करणे योग्य नाही. एससी, एसटीला क्रिमिलेअर लागू करण्यास आपला विरोध असल्याचे ते म्हणाले.

रामदास आठवले म्हणाले की, एससी, एसटीला आरक्षण मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठा संघर्ष केला. त्यांच्या संघर्षामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात २२.५ टक्क आरक्षण मिळाले. ओबीसींना आरक्षण देण्याचे ते समर्थक होते. मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यावर २७ टक्के आरक्षण मंजूर करण्यात आले. मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. परंतु मराठ्यांना सरसकट ओबीसीमधून आरक्षण देता येणार नाही. मराठ्यांना १० टक्के आरक्षण लागू करण्यात आले आहे. तर केंद्रात ईडब्ल्यूएस आरक्षण दिले आहे. याचा फायदा त्यांनी घेतला पाहिते. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, असे ते म्हणाले. 

राहुल गांधींवर टीका

झारखंडमध्ये पेपर फुटीविरोधात विद्यार्थी आंदोलन करीत आहेत. याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आंदोलन संपुष्ठात आणण्याबाबत पत्र लिहिले. यावर आठवले म्हणाले की, राहुल गांधीची भूमिका नेहमीच दुटप्पी पाहिली आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या वेळी त्यांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. परंतु झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा त्यांनी राजीनामा मागितला नाही. ते फक्त आरोप लावण्याचे काम करतात, असे आठवले म्हणाले.

जागा शुद्धीकरण करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे

काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे हे मागासवर्गीय आहेत. त्यांची उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे सभा झाली होती. त्यानंतर काही जणांनी सभा जागा शुद्ध करून घेतली. हा प्रकार त्यांचा अपमान असून त्याचे समर्थन होऊ शकत नाही. अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे, असे आठवले म्हणाले.

ओबीसीच्या रकान्याबाबत जनगणना विभागाशी बोलेल

जातनिहाय जनगणना करण्याबाबत सरकारने कायदा केला आहे. त्यामुळे ओबीसींचीही जनगणना होईल. ओबीसींसाठी स्वतंत्र रकना नाही. तो असावा दिल्लीत गेल्यावर जनगणना विभागाशी बोलून याची माहिती घेईल, असे ते म्हणाले.

दीक्षाभूमीचा वाद मिटवण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवा

दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये अध्यक्ष पदावरून वाद सुरू आहे. राजेंद्र गवई व भंत सुरेई ससाई यांच्यात वाद सुरू आहे. हा वाद मिटला पाहिजे. तो मिटत नसेल तर माझ्याकडे जबाबदारी दिल्यास मी वाद मिटवेल, असे आठवले म्हणाले. शरद पवार यांनी एनडीए यावे यावेळी शरद पवार यांनी एनडीए, सोबत आले पाहिजे, असेही आठवले म्हणाले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाराष्ट्रातील मतदार यादीतून २ कोटी नावे हटवली; निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर रोहित पवारांचा दावा

संबंधित बातम्या