शिराळ्याची जगप्रसिद्ध नागपंचमी "अंबाबाईच्या नावाने चांगभले"च्या गजरात उत्साहात; ४१ जिवंत नागांचे दर्शन घडल्याने भाविकांच्या उत्साहाला उधाण

by Team Satara Today | published on : 17 August 2026


शिराळा : "अंबाबाईच्या नावाने चांगभले..."  च्या जयघोषात, गुलालाची मुक्त उधळण व फटाक्यांच्या आतिषबाजीत शिराळ्याची जगप्रसिद्ध नागपंचमी अत्यंत उत्साहात, श्रद्धा आणि भक्तिमय वातावरणात शांततेत पार पडली. २००२ सालापासून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिराळ्यात प्रतीकात्मक नाग मूर्तीची मिरवणूक काढण्यात येत होती. परंतु गेल्या दोन वर्षांपासून शैक्षणिक व प्रबोधनाच्या दृष्टीने जिवंत नाग पकडण्यास विशेष परवानगी मिळाल्यामुळे, यावर्षी ४१ जिवंत नागांचे प्रत्यक्ष दर्शन घडल्याने भाविकांच्या उत्साहाला उधाण आले होते.

सकाळी १० च्या सुमारास मानाच्या पालखीचे प्रमोद महाजन व रामचंद्र महाजन यांच्या निवासस्थानी भावपूर्ण पूजन करण्यात आले. यावेळी आमदार सत्यजीत देशमुख,सौ.सुनितादेवी नाईक,सौ.रेणुकादेवी देशमुख,जिल्हा परिषद सदस्य विराज नाईक,नगराध्यक्ष पृथ्वीसिंह नाईक,राजसिंह पाटील,महेश खंडागळे,अजय जाधव आदींनी पालखीचे दर्शन घेऊन पूजन केले. पूजनानंतर ही मानाची पालखी मिरवणुकीच्या अग्रस्थानी मार्गस्थ झाली.

दुपारी १२ ते ३ या वेळेत भाविकांना जिवंत नागांचे सुलभ दर्शन व्हावे यासाठी मुख्य स्टेजवर नाग सोडण्यात आले होते. या दुर्मीळ व अलौकिक दर्शनासाठी अंबामाता मंदिर परिसर आणि मुख्य चौकात भाविकांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. पावसातही तरुणाई पारंपरिक वाद्यांच्या व संगीताच्या तालावर सायंकाळी उशिरापर्यंत थिरकत होती. ही भव्य मिरवणूक रात्री १० वाजेपर्यंत सुरू होती. शहरात मेवा-मिठाईची दुकाने, खेळण्यांचे स्टॉल्स आणि विविध पाळण्यांमुळे जत्रेचे भव्य स्वरूप प्राप्त झाले होते. माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, भाजप नेते सम्राट महाडिक, ॲड.भगतसिंग नाईक,रणधीर नाईक,केदार नलावडे आणि माजी सरपंच देवेंद्र पाटील आदींनी नाग मंडळांना भेटी देऊन शुभेच्छा दिल्या.

उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधीक्षक अरुण पाटील, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार शामला खोत-पाटील, पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले, मुख्य वनसंरक्षक ए. लक्ष्मी,उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील,वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश कांबळे,मुख्याधिकारी सूरज कांबळे यांनी चोख नियोजन केले होते.

दुर्मीळ 'पांढरा नाग' ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

वाळवा तालुक्यातील डोंगरवाडी येथे सापडलेला दुर्मीळ ल्युसिस्टिक (पांढरा) नाग 'कच्याड युवाशक्ती शिराळा' यांच्या वतीने दर्शनासाठी आणण्यात आला होता. शरीराचा रंग पूर्ण पांढरा परंतु डोळे काळे असलेल्या या इंडियन कोब्राच्या ल्युसिस्टिक रंगप्रकाराला पाहण्यासाठी भाविकांनी विशेष गर्दी केली होती. उत्सव संपल्यानंतर या नागाला वनविभागाच्या देखरेखीखाली सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
युक्रेनचा रशियाच्या क्षेपणास्त्र निर्मिती कारखान्यावर सर्वात मोठा हवाई हल्ला; ८०० हून अधिक ड्रोन डागले, ६ जणांचा मृत्यू
पुढील बातमी
महाराष्ट्रातील मतदार यादीतून २ कोटी नावे हटवली; निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर रोहित पवारांचा दावा

संबंधित बातम्या