नागपंचमी उत्सवासाठी शिराळा नगरी सज्ज; यावर्षी ४१ जिवंत नागांचे दर्शन होणार,२० सीसीटीव्ही कॅमेरे अन् शेकडो पोलिसांची तैनाती

by Team Satara Today | published on : 16 August 2026


शिराळा  : शिराळा येथे सोमवार (दि.१७ ऑगस्ट) रोजी साजऱ्या होणाऱ्या नागपंचमीची सर्व स्तरावर जय्यत तयारी झाली असून, शिराळा नगरपंचायत, वनखाते, आरोग्य विभाग, महसूल व पोलिस सज्ज झाले आहेत. यावर्षी ४१ जिवंत नागांचे दर्शन होणार आहे यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येण्याची शक्यता गृहीत धरून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

यात्रा सुरळीत पार पडावी, या करिता ६१७च्या वर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे, त्यामध्ये पोलीस उपअधीक्षक १, पोलीस निरीक्षक १२, पोलिस उप निरीक्षक ३७, पोलीस कर्मचारी ४३७, महिला पोलीस अंमलदार ५५, पुरुष अंमलदार ४३७ आणि वाहतूक पोलीस ६० कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, व्हिडिओ कॅमेरे १५, ध्वनी मापक यंत्र १२ , दंगल नियंत्रण पथक २ इत्यादींचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच बरोबर गुन्हेगारांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे, अंबामाता मंदिर परिसर ,मिरवणूक मार्ग या २० सीसीटीव्ही कॅमेरे,४ वाॅच टॉवर ठेवण्यात आले आहेत.१६ व्हिडिओ कॅमेरे द्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे.पोलीस निरीक्षक जंबाजी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साकेत पाटील व वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन, बी.कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य यंत्रणा  सज्ज झाली असून सर्प दंशावर प्रतिबंधक ६०० लशी उपलब्ध असून उप जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर आदी   यंत्रणा सज्ज  ठेवण्यात आली आहे .फिरती वैद्यकीय पथके ३२ असून शहरात ७आरोग्य पथके ठेवण्यात आली आहेत.एस, टी, बसस्थानक, व्यापारी हॉल,पाडळी नाका, लक्ष्मी चॊक ,शनिमंदिर, समाज मंदिर, नायकुड पुरा आदी सात ठिकाणी आरोग्य पथके तसेच अत्यावश्यक बाबीसाठी उपजिल्हा रुग्णालयातील सुविधांची तपासणी करून त्या अद्यावत ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तीन रुग्णवाहिका ठेवण्यात आली आहेत.

नगरपंचायतीने नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक, पंचायत समिती सभापती सम्राटसिंग नाईक ,उपनगराध्यक्ष बसवेश्वर शेटे,बांधकाम सभापती राजसिंह पाटील,मुख्याधिकारी सुरज कांबळे , वीज वितरणचे उपअभियंता हेमंत येडगे,नगरसेवक यांनी पाणी,आरोग्य, विद्युत पुरवठा, स्वच्छता यांनी यंत्रणा सज्ज केली आहे. शिराळा शहरास जोडणाऱ्या रस्त्यांचे देखभालीचे काम उप अभियंता वैभव जाधव व शाखा अभियंता संदीप मिसाळ यांनी केले आहे.

वनविभागाचे  वनक्षेत्रपाल रमेश  कांबळे यांनी १५०अधिकारी, कर्मचारी, तसेच १० गस्ती पथकांची नियुक्ती केली आहे.या पथकात २८ जणांची नियुक्ती केली आहे.तसेच ७ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.शहरातील ३२ गल्ल्यामध्ये पथकांचे लक्ष राहणार आहे. नागपंचमी उत्सवास येणाऱ्या भाविकांसाठी  शिराळा तालुका अंतर्गत व बाहेरील मार्गावर शिराळा आगाराच्या ३५ व बाहेरच्या आगाराच्या ३० बसेस यात्रेकरू साठी ठेवण्यात आल्याआहेत.  नागपंचमीच्या उत्सवा दरम्यान प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन तहसीलदार शामला खोत पाटील यांनी सर्व विभागाचा आढावा घेतला आहे.

प्रतिकात्मक नागाच्या मिरवणूकी साठी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून नामांकित बँड, बेंजो, आदीसह,पारंपरिक वाद्ये उशिरा दाखल झाली आहेत एकूणच शहराचे वातावरण भक्तिमय झाले आहे,पोलीस अधीक्षक तुषार दोषी. उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांनी भेटी देऊन विविध विभागांना सूचना दिली.

शिराळ्याची नागपंचमी ही सणा बरोबरच यात्रा म्हणून ओळखली जाते या यात्रे साठी गेल्या चार दिवसापासून ग्रामदेवता आंबा माता मंदिर परिसरात मेवामिठाई, खेळणी,हॉटेल,स्वेटर विकणारे, आदी स्टॉल भरून गेलेले आहेत.या यात्रेचा आनंद लुटण्यासाठी अनेक हौशी,नवसे,यात्रेकरू येतात.त्यांचे मनोरंजन व्हावे म्हणून पाळणे,मिनी ऐसेल वर्ड याचा आनंद लुटत आहेत. आंबामाता ट्रस्ट ने ग्रामदेवता अंबामाता मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली असून मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राहुल गांधी साधणार 'जेन झी'शी थेट संवाद; नाशिकमधील काँग्रेसच्या चिंतन शिबिरात करणार मार्गदर्शन
पुढील बातमी
तेव्हा माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं - पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

संबंधित बातम्या