सातारा : सातारा तालुक्यातील वर्णे, धनगरवाडी, निगडी, राजेवाडी, देगाव व कारंडवाडी परिसरातील शेतकर्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्या गुरुवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेचा भव्य भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला. या योजनेमुळे परिसरातील शेतकर्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊन शेतीला मोठी बळकटी मिळणार आहे. आमदार महेश शिंदे यांच्या पुढाकारातून या योजनेला गती मिळाली आहे.
भूमिपूजन सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सौ. प्रियाताई शिंदे, डॉ. अरुणाताई बर्गे, परिसरातील नागरिक, शेतकरी आणि पाचही गावचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार महेश शिंदे यांनी हा वचनपूर्तीचा कार्यक्रम असल्याचे सांगितले. 2017 पासून या भागातील दुष्काळी परिस्थिती पाहता तासगाव परिसराला पाणी मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना पूर्ण करण्याचा शब्द दिला होता आणि तो शब्द पाळला, असे शिंदे यांनी सांगितले.
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष असताना संपूर्ण खोर्यातील जलवाटपाचा फेरआढावा घेण्यात आला. तासगावच्या हक्काचे पाणी आरक्षित करण्यासाठी आपण प्रयत्न केले असून, या प्रयत्नांना आता मूर्त स्वरूप मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुढील 11 महिन्यांत या भागात पाणी आणण्याची जबाबदारी मी घेतो, असा शब्दही आमदार महेश शिंदे यांनी यावेळी जनतेला दिला.
ही योजना केवळ शेतीच्या सिंचनासाठी असून, तिचा मुख्य उद्देश शेतकर्यांना पाणी उपलब्ध करून देणे हा आहे, असेही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले. या योजनेबाबत विरोधकांकडून करण्यात येणार्या टीकेवर त्यांनी भाष्य करताना, विकासकामांबाबत वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्याची गरज असल्याचे सांगितले. शेतकर्यांच्या प्रश्नांवर राजकारण करण्यापेक्षा प्रत्यक्ष काम करून त्यांना न्याय देणे महत्त्वाचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
या योजनेमुळे वर्णे, धनगरवाडी, निगडी, राजेवाडी, देगाव आणि कारंडवाडी परिसरातील शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे. सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतीला बळकटी मिळणार असून, पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला स्थैर्य प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेतकर्यांना विविध पिकांचे नियोजन करता येणार असून, शेती उत्पादनातही वाढ होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, या परिसरातील रस्त्यांच्या प्रश्नाकडेही आमदार महेश शिंदे यांनी लक्ष वेधले. देगाव फाटा ते परिसरातील रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यामुळे सिंचनाबरोबरच परिसरातील रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांनाही चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास परिसरातील नागरिक, शेतकरी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भूमिपूजन सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, योजना पूर्णत्वास गेल्यानंतर या भागातील शेतीच्या चित्रात मोठा बदल होण्याची अपेक्षा शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे.