सातारा : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर म्हसवड पोलिसांनी नागरिकांना अनोखी भेट देत गहाळ झालेले तब्बल 48 मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन केले. सीइआयआर पोर्टलच्या प्रभावी वापरासह पोलिसांच्या तांत्रिक कौशल्यामुळे सुमारे 9 लाख 70 हजार रुपये किंमतीचे महागडे स्मार्टफोन शोधून काढण्यात यश आले.
म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल गहाळ होण्याच्या तक्रारी वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला गहाळ मोबाईलचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाने सीइआयआर पोर्टलच्या माध्यमातून मोबाईलची तांत्रिक माहिती तपासून शोधमोहीम सुरू केली.
या मोहिमेदरम्यान महाराष्ट्रासह परराज्यांमध्ये वापरात असलेल्या गहाळ मोबाईलचा माग काढण्यात आला. संबंधित मोबाईल वापरणार्या व्यक्तींशी संपर्क साधून तसेच सातत्याने पाठपुरावा करून हस्ते-परहस्ते गेलेले 48 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले.
स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात म्हसवड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन माने, नगराध्यक्षा पूजा विरकर तसेच नगरसेवकांच्या हस्ते हे मोबाईल संबंधित नागरिकांकडे सुपूर्द करण्यात आले. आपला हरवलेला मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी म्हसवड पोलिसांसह सातारा जिल्हा पोलिसांचे आभार मानले.
गहाळ होणारे अधिकाधिक मोबाईल त्यांच्या मूळ मालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी म्हसवड पोलिसांची ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन आणि पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल नारनवर, इंदलकर, तसेच पोलीस कॉन्स्टेबल विनोद सपकाळ, नवनाथ शिरकुळे, वसिम मुलाणी आणि राहुल थोरात यांनी मोबाईल शोध मोहिमेत महत्त्वपूर्ण योगदान दिले.