मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष ज्या पद्धतीने फोडण्यात आले, ते संविधानाच्या चौकटीत बसणारे नाही. निवडणूक आयोगासह यंत्रणांचा ज्या पद्धतीने गैरवापर झाला, तो लोकशाहीसाठी घातक आहे, अशी टीका शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष, खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना केली.
शिवसेना ही काल, आज आणि उद्याही उद्धव ठाकरे यांचीच राहील, असे सांगताना खा.सुळे म्हणाल्या की, राज ठाकरे यांनी ज्या पद्धतीने स्वतंत्र पक्ष स्थापन केला, त्याप्रमाणे स्वतःच्या कर्तृत्वावर पक्ष उभा करणे हा कौतुकाचा विषय ठरला असता.
राष्ट्रवादी पक्ष शरद पवार यांचाच, पुरावे सादर केले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक सदस्य शरद पवार असून, पक्षाच्या संविधानात आमदार-खासदारांच्या मतदानाची तरतूद नाही. पक्ष ज्याचा आहे, त्याच्याकडे तो राहील, अशी तरतूद आहे. यासंदर्भातील सर्व पुरावे न्यायालयात सादर केले आहेत. निवडणूक आयोगाने अन्याय केला.
परदेशी निधीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्याला आमचा विरोध नाही. मात्र, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या संस्थांना परदेशातून निधी मिळवताना अडथळे निर्माण करणे योग्य नाही, अशी भूमिका सुळे यांनी मांडली.