सातारा : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पूर्वसंध्येला सातारा शहरातील छत्रपती शिवाजी सर्कल पोस्ट ऑफिस आणि सयाजी शाळा परिसरातील खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था, सातारा यांच्या वतीने अनोख्या पद्धतीने खड्डे भरो आंदोलन’ करण्यात आले.
विशेष म्हणजे, ज्यांना स्वतःच्या दैनंदिन जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशाच दिव्यांग बांधवांनी स्वतः कसरत करत रस्त्यावरील खड्डे भरले. समाजाने आणि प्रशासनाने दुर्लक्षित केलेल्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी स्वतः हातात साहित्य घेत रस्त्यावर उतरून सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण निर्माण केले.
संस्थेचे अध्यक्ष अजय पवार, तसेच अमोल प्रकाश निकम, अमोल भातुसे, ताज भाई मुलानी, शैलेंद्र बोर्डे, शांताराम देवरे, पांडुरंग शेलार, बाळासाहेब रेवले, संतोष भोसले, देवरे दादा यांच्यासह अनेक दिव्यांग बांधवांनी या आंदोलनात सहभाग घेतला. आम्हाला सहानुभूती नको, आम्हाला सुरक्षित आणि सन्मानाने चालता येईल असा रस्ता हवा, हा संदेश या आंदोलनातून प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दिव्यांग व्यक्तींना रस्त्यावरून ये-जा करताना खड्डे, असमतोल रस्ते आणि अडथळ्यांचा मोठा त्रास सहन करावा लागतो. मात्र, आपल्या वेदनांना बाजूला ठेवून आपल्या शहरासाठी आपणच काहीतरी केले पाहिजे’ या भावनेतून या दिव्यांग बांधवांनी खड्डे भरले. त्यांच्या या कृतीने उपस्थित नागरिकांचे मन हेलावून गेले.
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दिव्यांग बांधवांनी केलेले हे आंदोलन केवळ खड्डे भरण्याचे नव्हते, तर प्रशासनाला आणि समाजाला जागे करणारा संवेदनशील संदेश होता. स्वतः अडचणींमध्ये असतानाही इतरांसाठी पुढे येण्याची त्यांची जिद्द आणि सामाजिक बांधिलकी पाहून सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी या दिव्यांग बांधवांचे मनापासून कौतुक केले. ज्यांना आधाराची गरज आहे, त्यांनीच आज शहराला आधार दिला, या भावनेने आंदोलनाची चर्चा शहरात होत आहे.