शेतीकामासाठी काढलेल्या कर्जाची रक्कम पिशवीला कटर मारून लंपास; म्हसवडच्या आठवडी बाजारातील घटना

by Team Satara Today | published on : 14 August 2026


म्हसवड : शेतीकामासाठी काढलेल्या कर्जाची रक्कम घेऊन म्हसवडच्या आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्याच्या पिशवीतून अज्ञात चोरट्यांनी ८५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. पिशवीला कटर मारून रोकड चोरल्याचे लक्षात येताच शेतकरी अंकुश अन्याबा लुबाळ यांना भर बाजारातच रडू कोसळले. याप्रकरणी त्यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिस तपास सुरू आहे.

अंकुश लुबाळ हे पालिका हद्दीतील मासाळवाडी येथील लुबाळवस्ती येथे राहतात. शेतीकामासाठी त्यांनी एका पतसंस्थेतून कर्ज घेतले होते. संबंधित संस्थेने कर्जाच्या रकमेपोटी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा धनादेश दिला होता. हा धनादेश घेऊन लुबाळ म्हसवड येथील जिल्हा बँकेत आले. त्यांनी धनादेश जमा करून ८५ हजार रुपये रोख रक्कम घेतली. ही रक्कम स्वतःजवळील पिशवीत ठेवून ते बाजारात खरेदीसाठी गेले.

बाजारात काही वस्तूंची खरेदी केल्यानंतर त्या पिशवीत ठेवण्यासाठी लुबाळ यांनी पिशवी उघडली. त्यावेळी पिशवीला कटर मारून ती फाडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पिशवीतील अन्य वस्तूंच्या खाली ठेवलेली रोकड तपासली असता ८५ हजार रुपये गायब असल्याचे लक्षात आले. कर्जाची रक्कमच चोरीला गेल्याने लुबाळ यांना मोठा धक्का बसला.

यावेळी बाजारात उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते धनाजी शिंदे यांनी लुबाळ यांची घालमेल पाहिली. ओळखीचे असल्याने त्यांनी त्यांना जवळ बोलावून चौकशी केली. लुबाळ यांनी फाटलेली पिशवी दाखवत घडलेला प्रकार सांगितला. शिंदे यांनी त्यांना तातडीने पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला देत पोलिसांना फोन करून तक्रार नोंदवण्याची विनंती केली. त्यानंतर पोलिस कर्मचारी बाजारात दाखल झाले; मात्र तोपर्यंत चोरट्यांनी डाव साधला होता.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांच्या पुनर्वसनासाठी धारित धोरण लवकरच तयार करण्यात येणार - मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील
पुढील बातमी
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील ८२ जवानांना शौर्य व सेवा पदके जाहीर; विविध क्षेत्रांत बजावलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी गौरव

संबंधित बातम्या