टोलवसुली सुरू, रस्ते मात्र खड्ड्यात; ज्येष्ठ नागरिक संघटनांचा प्रशासनाला सवाल

by Team Satara Today | published on : 14 August 2026


सातारा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी आणि तासवडे टोलनाक्यांवरील टोलवसुलीच्या मुद्द्यावरून सातार्‍यातील ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. महामार्ग तसेच सेवा रस्त्यांची दुरवस्था कायम असताना वाहनचालकांकडून टोल आकारणी सुरूच असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. टोलदरात मोठी कपात करून वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी 19 ज्येष्ठ नागरिक संघटनांनी केली.

ज्ञानविकास मंडळाचे कार्यवाहक प्रसाद चाफेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्यात आली. जिल्हा परिषद सदस्य राजू शेळके, डॉ. कर्मवीर मार्तंडराव सूर्यवंशी, चर्चा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. हेमलता हिरवे, उपाध्यक्ष ओम सूर्यवंशी, सचिव उदय शंकर सूर्यवंशी, खजिनदार डॉ. ओंकार हिरवे यांच्यासह विविध ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

सातारा ते पाचवड दरम्यानच्या सेवा रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून, अनेक ठिकाणी रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. महामार्गालगतचे बॅरिकेड्स व लोखंडी साहित्यही गायब असल्याचे आंदोलकांनी निदर्शनास आणून दिले. खड्डे बुजविण्याच्या नावाखाली करण्यात आलेल्या कामामुळे रस्त्यावर उंचवटे निर्माण झाले असून, वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.हलक्या वाहनांसाठी 10 रुपये, चारचाकी वाहनांसाठी 20 रुपये, तर अवजड व 12 चाकी वाहनांसाठी 30 रुपये टोल आकारावा, अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांची तातडीने बैठक घेऊन रस्त्यांची दुरुस्ती, सेवा रस्त्यांची स्थिती आणि टोलवसुलीबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी चाफेकर यांनी केली. रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून तातडीने बैठक घेऊन याबाबत लवकर उपाययोजना करण्यात यावी, अशी अपेक्षा जिल्हाधिकार्‍यांकडे ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली .

आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी संबंधित निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठवून पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. आंदोलनात निमा, चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशनसह विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले. आयएमएचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. अशोक सूर्यवंशी यांचीही उपस्थिती होती.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जि. प. सातारा प्रांगणात सुरक्षित फवारणी अभियान 2026 चा शुभारंभ व रथाचे उद्घाटन उत्साहात
पुढील बातमी
जिल्ह्यातील सर्व शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे : सुषमा राजेघोरपडे

संबंधित बातम्या