सातारा : सुरक्षित, शुद्ध आणि पौष्टिक अन्न हा निरोगी समाजाचा पाया मानून सातारा जिल्हा परिषद व जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने ‘मुख्यमंत्री विषमुक्त स्वयंपाकघर अभियान’ दि. 15 ऑगस्टपासून जिल्हाभर सुरू करण्यात येणार आहे. ‘विषमुक्त अन्न, निरोगी सातारा!’ या घोषवाक्याखाली अन्नभेसळ, हानिकारक कृत्रिम खाद्य रंगांचा वापर, अन्न सुरक्षा, सुरक्षित अन्नाची निवड आणि निरोगी आहाराच्या सवयी यांवर केंद्रित व्यापक लोकचळवळ उभारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी आरोग्य समितीचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. ऋतुजा शिंदे, कृषी सभापती लता कर्णे, सदस्य दिलीप बाबर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नागेश ठोंबरे, शिक्षणअधिकारी अनिस नायकवडी, धनंजय चोपडे यांची उपस्थिती होती.
डॉ. प्रियाताई शिंदे पुढे म्हणाल्या, हे अभियान दि. 15 ऑगस्ट ते एप्रिल 2027 या कालावधीत टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून, ग्रामपंचायतींमध्ये शपथविधी करून अभियानाची सुरुवात केली जाणार आहे. दि. 26 जानेवारीपर्यंत विशेष जनजागृती उपक्रम राबविले जाणार असून, गुढीपाडव्याच्या निमित्ताने विषमुक्त अन्न प्रदर्शन आयोजित करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम घेण्याचा संकल्प जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. दैनंदिन वापरातील अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ नागरिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका ठरत असल्याने अन्न सुरक्षा ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिक, कुटुंब, ग्रामपंचायत, शाळा, महिला बचत गट, दुकानदार आणि समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे, या भावनेतून हे अभियान राबविण्यात येणार आहे. सुरक्षित अन्नाची निवड, विषमुक्त स्वयंपाकघर, योग्य लेबलिंग असलेली उत्पादने, औषधी परसबाग तसेच स्थानिक व हंगामी अन्नाच्या वापरावर विशेष भर दिला जाणार आहे.
अभियानाच्या समारोपाच्या टप्प्यावर जिल्हास्तरीय ‘विषमुक्त सातारा सरस’ महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. या महोत्सवात महिला बचत गट उत्पादने, अन्नभेसळ तपासणी प्रात्यक्षिके, आरोग्यदायी पाककला प्रात्यक्षिके, खाद्यपदार्थ स्टॉल, विद्यार्थी विज्ञान प्रदर्शन, तज्ञांचे मार्गदर्शन तसेच उत्कृष्ट गाव, शाळा, महिला बचत गट आणि दुकानदारांचा गौरव करण्यात येणार आहे.
या अभियानाच्या नियोजन व अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद प्रशासन पुढाकार घेणार असून या अभियानाद्वारे प्रत्येक घरात ‘विषमुक्त स्वयंपाकघर’, प्रत्येक गाव ‘विषमुक्त गाव’ आणि संपूर्ण सातारा ‘निरोगी सातारा’ बनविण्याचा संकल्प जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे. यावेळी राजूभैय्या भोसले, याशनी नागराजन यांनीही या अभियानविषयी माहिती दिली.
या अभियानातील प्रमुख आकर्षण ‘विषमुक्त गाव स्पर्धा’ असणार आहे. ग्रामपंचायतींमध्ये जनजागृती कार्यक्रम, ग्रामस्थांचा सहभाग, सुरक्षित स्वयंपाकघरांची संख्या, महिला बचत गटांचा सहभाग, सुरक्षित दुकाने, विद्यार्थी-युवक उपक्रम आणि औषधी परसबाग या निकषांवर स्पर्धा होणार असून, उत्कृष्ट कामगिरी करणार्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार व इतर बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे.