कराडला ऑलिम्पिकपटू खाशाबांच्या नावाने क्रीडा संकुल साकारणार : अतुल भोसले, आढावा बैठकीत माहिती

by Team Satara Today | published on : 13 August 2026


कराड : भारताला पहिले ऑलम्पिक पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या नावाने क्रीडा संकुल होण्यास तब्बल १७ वर्षे लागत असतील तर ही उदासीनता असून याची खंत वाटते. महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने आदर्श वाटेल अशा पद्धतीचे क्रीडा, कुस्ती संकुल कराड येथे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून साकारणार आहे. तसेच कराड तालुक्यातील ४६ किमीपर्यंतचे रस्ते मुख्यमंत्री बळीराजा शेती पाणंद योजनेत घेतले असल्याची माहिती कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कराडात दिली.

कराड येथील शासकीय विश्रामगृहात अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीतत ‘हर घर तिरंगा’ अभियान, दिवंगत खाशाबा जाधव क्रीडा संकुल, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना, कृषी विभागासह महामार्गाच्या प्रलंबित कामांबाबत मंगळवारी आढावा बैठक पार पडली. या बैठकीस प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, कराड मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर, कराड पंचायत समिती सभापती नंदा यादव यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

या आढावा बैठकीवेळी डॉ. अतुल भोसले यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेत संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कृषी विभागांच्या अधिकाऱ्यांची खरीप हंगामाच्या पेरणीच्या बाबतीत आम्ही बैठक घेतल्या असून १४ रोजी एक हजार शेतकऱ्यांचा कृषी मेळावा घेणार असल्याची माहिती आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी यावेळी दिली.

कराडला अभिमान वाटेल असे स्टेडियमचे काम होणार

कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे काम प्रगतीपथावर असून वेळेच्या अगोदर हे काम पूर्ण करू याची आम्हाला खात्री वाटते. स्टेडियमच्या कामामुळे खेळाडूंची गैरसोय होतेय. त्यांची होणारी अडचण दूर करण्यासाठी दर्जेदार पद्धतीचे आणि कमी वेळेत काम पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून कराडला अभिमान वाटेल अशा पद्धतीची लँडमार्क डेव्हलपमेंट ही छत्रपती शिवाजी महाराज संकुलाच्या माध्यमातून झालेली पाहायला मिळेल, असे डॉ. अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उरमोडी जलाशयात बुडालेल्या साताऱ्यातील तरुणाचा मृतदेह तिसऱ्या दिवशी सापडला
पुढील बातमी
सायबर चोरीतील ८९ लाख रुपये साताऱ्यातील तरुणाच्या खात्यावर; सातारा सायबर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा, आंतरराज्य टोळीचे कनेक्शन

संबंधित बातम्या