सातारा : परळी, ता. सातारा गावच्या हद्दीत असलेल्या उरमोडी धरणाच्या जलाशयात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमच्या जवानांना तिसऱ्या दिवशी यश आले.
मयूर उर्फ ओंकार प्रमोद कदम (वय ३२, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. उरमोडी धरण जलाशयाजवळील एका हॉटेलमध्ये काही युवक सोमवार, दि. १० रोजी दुपारी जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपल्यानंतर काही वेळ गप्पा मारल्यानंतर त्यांच्यापैकी मयूर उर्फ ओंकार कदम हा जलाशयात पोहण्यासाठी उतरला. मात्र बराच वेळ होऊनही तो पाण्याबाहेर न आल्याने त्याच्यासोबत असलेल्या युवकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही.
शिवेंद्रसिंह रेस्क्यू टीमचे जवान तसेच महाबळेश्वर सर्च अॅंड रेस्क्यू टीम, प्रतापगड रेस्क्यू टीम यांनी जलाशयात शोध मोहीम राबविली. सलग तिसऱ्या दिवशी शोध मोहिमेदरम्यान अखेर तरुणाचा मृतदेह जलाशयात आढळून आला.