कॉकरोच जनता पार्टीला बैठकीसाठी जागा मिळू नये म्हणून भाजपकडून दबाव - अभिजीत दीपके यांचा आरोप

by Team Satara Today | published on : 13 August 2026


दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके यांना दिल्लीतील एका निवासी सोसायटीच्या पार्कमधून हाकलल्याची घटना समोर आली आहे. दीपके आपल्या टीममधील सौरभ दास, आशुतोष रंका आणि काही समर्थकांसोबत ‘जंतर-मंतर सीझन 2’च्या नियोजनासाठी पार्कमध्ये आले होते. मात्र सोसायटीतील रहिवाशांना याची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने लोक पार्कमध्ये जमा झाले. त्यांनी तिथे बैठक घेण्यास विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये काही काळ वाद झाला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर परिस्थिती शांत झाली आणि दीपके यांना समर्थकांसह पार्कमधून निघून जावे लागले.

बैठक घेण्यासाठी जागा मिळत नसल्याचा दीपके यांचा आरोप

या घटनेपूर्वी अभिजीत दीपके यांनी दिल्लीमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत बैठक घेण्याची तयारी केली होती. त्यासाठी त्यांना हॉलची आवश्यकता होती. मात्र अनेक ठिकाणी संपर्क करूनही हॉल मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला.

दीपके यांच्या म्हणण्यानुसार, काही हॉल मालकांनी “वरून दबाव आहे” असे सांगत CJPच्या बैठकीसाठी जागा देण्यास नकार दिला. शेवटी मोठ्या प्रयत्नांनंतर एका ठिकाणी हॉल मिळाला आणि त्याची पावतीही आपल्याकडे असल्याचे दीपके यांनी सांगितले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी हॉल देणाऱ्या व्यक्तीनेही बैठक घेण्यास नकार दिल्याचा त्यांचा आरोप आहे. या व्यक्तीला धमकी देण्यात आल्याचा दावाही दीपके यांनी केला आहे.

भाजपवर गंभीर आरोप

बैठकीसाठी जागा मिळू नये म्हणून भाजपकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप अभिजीत दीपके यांनी केला. CJPच्या लोकांना बैठक घेण्यासाठी जागा देणाऱ्यांना धमकावले जात असल्याचे त्यांनी म्हटले. दीपके यांनी बंदिस्त हॉलमध्ये बैठक घेण्यासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक नसल्याचेही सांगितले. त्यामुळे आपल्याला बैठक घेण्यापासून जाणीवपूर्वक रोखले जात असल्याचा त्यांचा दावा आहे.

हॉल मिळाला नाही म्हणून पार्कमध्ये बैठक

हॉलची व्यवस्था न झाल्यामुळे दीपके आपल्या टीमसह एका निवासी सोसायटीच्या पार्कमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी समर्थकांसोबत ‘जंतर-मंतर सीझन 2’च्या नियोजनावर चर्चा सुरू केली. यावेळी त्यांनी समर्थकांना पुढे कोणाच्या राजीनाम्याची मागणी करायची, असा प्रश्न विचारला. त्यावर समर्थकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याचे सांगण्यात आले.

‘जंतर-मंतर सीझन 2’ लवकरच सुरू करणार

दरम्यान, अभिजीत दीपके यांनी ‘जंतर-मंतर सीझन 2’ लवकरच सुरू करण्याची घोषणा केली आहे. CJPचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनीही देशभरात सरकार आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन उभारण्याची भूमिका मांडली. पक्षाकडून देशव्यापी ‘लिसनिंग टूर’ सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

शिक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष

आगामी काळात शिक्षणाचा मुद्दा प्राधान्याने हाताळला जाणार असल्याचे CJPकडून सांगण्यात आले आहे. पालक आणि नागरिकांनी सरकारी शाळांमध्ये जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा, शाळांमधील समस्या नोंदवाव्यात आणि त्या सार्वजनिक कराव्यात, असे आवाहन पक्षाने केले आहे. सरकारी शाळांमधील परिस्थिती सुधारण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, अशी भूमिका CJPने मांडली आहे. आता ‘जंतर-मंतर सीझन 2’च्या घोषणेनंतर CJP पुढे कोणती भूमिका घेणार आणि त्यांच्या आंदोलनाला किती प्रतिसाद मिळणार, याकडे लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये तलवारीने प्राणघातक हल्ला; खाजगी रुग्णालयात तातडीचे उपचार
पुढील बातमी
कराडमध्ये तिरंगा रॅलीला भव्य प्रतिसाद; ३२५ फूट लांब ध्वज ठरला खास आकर्षण; सुमारे १० हजारांवर विद्यार्थी, नागरिकांचा सहभाग

संबंधित बातम्या