सातारा : सातारा शहरालगतच्या पश्चिमेकडे असलेल्या मोळाचा ओढा तिकाटण्यातील व्यावसायिकांच्या अतिक्रमणांनी उच्छाद मांडला होता. यामुळे या चौकातील अतिक्रमित दुकाने हटवण्याबाबत आठवड्यापूर्वी नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून कर्मचारी व पोलिसांच्या माध्यमातून व व्यावसायिकांच्या सामोपचाराने ही अतिक्रमणे हटवली. ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा व तालुका पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.
मोळाचा ओढा चौकालगत असलेल्या पश्चिमेकडील तीकाटण्यात व मेढा रस्त्यालगत बेकायदेशीररित्या व्यवसाय थाटले होते. यामुळे येथील परिसराची कोंडी होऊन रहदारी व वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला होता. शिवाय येथील रस्त्याच्या कोंडीमुळे अनेकवेळा छोटे-मोठे अपघात झाले होते. शहराच्या पश्चिमेकडे असलेल्या या मुख्यद्वाराला अतिक्रमणामुळे विद्रूपीकरण आले होते.
शिवाय येथील अतिक्रमण हटवून या तिकाटण्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व परिसरातील नागरिकांनी केली होती. यामुळे बुधवारी सकाळपासून येथील अतिक्रमणे हटवण्याबाबत बांधकाम विभाग व तालुका पोलीस ठाण्याच्यावतीने कारवाई करण्यात आली. दरम्यान सातारा ते मेढा रस्त्यानजीकच काही व्यावसायिकांनीही अतिक्रमणे केली होती. रस्त्यानजीकचे पथदिवे, फ्लेक्स व झाडे यांच्या आडोशाने अतिक्रमणे उभी राहत होती.
यामुळे या चौकातील अतिक्रमित दुकाने हटवण्याबाबत आठवड्यापूर्वी नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्यानंतर संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून कर्मचारी व पोलिसांच्या माध्यमातून व व्यावसायिकांच्या सामोपचाराने ही अतिक्रमणे हटवली. यावेळी काही अतिक्रमित व्यावसायिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा व तालुका पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. या कारवाईमुळे व्यावसायिकांची धावपळ होऊन काहींनी स्वतः पुढाकार घेत टपरी व दुकाने हटवली, तर काहींची जेसीबींच्या साह्याने ही अतिक्रमणे काढण्यात आली.
यावेळी स्वतः सभापती महेश गाडे यांनी अतिक्रमित व्यवसायिकांशी चर्चा करून सामोपचारातून अतिक्रमणे काढण्यात मदत केली. या कारवाईमध्ये कोणताही दुजाभाव न करता बेकायदेशीर व वाहतुकीस अडथळा असणारी अतिक्रमणे काढून थेट कारवाई करा, असे निर्देश यावेळी सभापती गाडे यांनी दिले. यावेळी शाखा अभियंता निलेश कोहळे, माजी सरपंच नंदकुमार पवार, किरण गाडे, तलाठी गणेश बोबडे, हवालदार उमेश माने, पोलीस पाटील दत्तात्रय पवार, तुकाराम सपकाळ, अमोल पवार, विजय पवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी, तालुक्याचे पोलीस व नागरिक उपस्थित होते.