सातारा : सातारा जिल्ह्यातील छत्रपतींच्या गादीबद्दल आपल्याला मनापासून आदर आहे. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडून मला कोणतीही वैयक्तिक मागणी नाही. मात्र, त्यांच्या जवळ असलेल्या दीडशे-दोनशे वर्षांपूर्वीच्या कुणबी नोंदींची ‘आरक्षणाची शिदोरी’ मराठा समाजासाठी खुली करावी, अशी स्पष्ट अपेक्षा मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी व्यक्त केली.
साताऱ्यातील पत्रकार परिषदेत जरांगे यांनी दोन्ही राजेंना थेट आवाहन केले. “मला साताऱ्यातील दोन्ही राजांकडून काहीही नको. त्यांच्याकडे दीडशे-दोनशे वर्षांपूर्वीच्या आरक्षणाच्या नोंदींचा डबा असेल, तर तो मराठा समाजासाठी उघडून द्यावा. मराठा समाजाच्या मुलांचे कल्याण करावे, एवढीच आमची अपेक्षा आहे,” असे त्यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाच्या लढ्यात साताऱ्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी छत्रपती घराण्याच्या ऐतिहासिक योगदानाचा आदरही व्यक्त केला. राजघराण्याकडे उपलब्ध असलेल्या जुन्या नोंदींमुळे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला ऐतिहासिक आधार मिळू शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“राजेंनी आरक्षणाची शिदोरी मराठा बांधवांना द्यावी. ही शिदोरी समाजाच्या मुलांच्या भवितव्यासाठी वापरली गेली पाहिजे,” असा सूर जरांगे यांच्या वक्तव्यातून उमटला.
खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या मागणीचा गांभीर्याने विचार करून जुन्या नोंदी समाजासमोर आणाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राजकीय पद, सत्ता किंवा वैयक्तिक लाभाची आपली अपेक्षा नसून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हाच आपल्या लढ्याचा केंद्रबिंदू असल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले.