कराड : होऊ घातलेली सातारा जिल्हा बँकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत, असे मत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. मग पाटणमध्ये महायुतीचा धर्म कसा पाळणार? असे विचारताच तुम्ही कसे जरी छेडले तरी महायुती हेच माझे उत्तर असेल, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद निवडणुकीतील वादाबद्दल छेडले असता, काही जखमा वरून बऱ्या झाल्यासारख्या दिसतात, असे म्हणत त्यांनी मनातील सल व्यक्त केली.
कराड येथे मंगळवारी शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांच्या मतदारसंघातील सुपने मंडलातील कामांचा आढावा बैठक घेतली. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार कल्पना ढवळे आदींची उपस्थिती होती.
मंत्री देसाई म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी मला भेटीचा निरोप दिला होता. त्यामुळे मी त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी त्यांना लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा 'दौलत' हा ग्रंथ भेट दिला. त्यामध्ये जिल्हा बँकेच्या अनुषंगाने कोणतीही चर्चा झालेली नाही.
मंत्री देसाई-जरांगे भेट होणार नाही
मनोज जरांगे-पाटील यांनी २ दिवसांपूर्वी आम्ही मंत्री शंभूराज देसाई व उदय सामंत यांच्यावर विश्वास ठेवतो असे म्हटले होते. आता ते सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यामुळे तुमची भेट होणार आहे काय? असे विचारले असता मंत्री देसाई यांनी, "मी आजपासून दोन दिवसांसाठी बाहेरगावी जात आहे, त्यामुळे भेट होणे अशक्य असल्याचे सांगितले.
राऊत बोलतात ते कधी खरं झालंय का?
शिवसेना कोणाची यावरून सध्या न्यायालयात वाद सुरू आहे. कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद ऐकल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी आमचं मनोबल वाढले आहे असे म्हटले आहे. याबाबत विचारले असता, राऊत हे हवेत बाण मारतात. ते बोलतात ते कधी खरं होतं काय? असा टोला त्यांनी लगावला. शिवाय सिब्बल यांनी केला तो युक्तिवाद आहे. खरंतर पिक्चर अभी बाकी है, असेही ते म्हणाले.
उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची घाई
कराडच्या उड्डाणपुलावरून अजूनही रात्रीची वाहतूक सुरू दिसत नाही. रात्रीच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेली लाईटची व्यवस्था झालेली दिसत नाही. त्यामुळे बऱ्याचदा वाहतुकीला अडचणी येत आहेत. याबाबत मंत्री देसाई यांना छेडले असता, कराडच्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची घाई झालेली दिसते. नॅशनल हायवेकडून दिवस-रात्र वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल योग्य असल्याचा अहवाल आल्यावरच याचे उद्घाटन करायला हवे होते, असे मत व्यक्त करीत पालकमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला टोला लगावला.