सातारा : नागरिकांची विविध कारणांमुळे शासकीय कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेली कामे तसेच नवीन शासकीय कामांना गती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा अभियान’ राबविण्यात येत आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यात या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत गुरुवार, दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सातारा येथील शासकीय विश्रामगृह (सर्किट हाऊस) येथे नागरिकांची निवेदने स्वीकारण्यात येणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांच्याकडे यापूर्वी अग्रेषित केलेल्या तसेच नव्याने मांडावयाच्या शासकीय कामांसंदर्भातील निवेदनांचा यावेळी स्वीकार करण्यात येणार आहे. मा. संतोष साखरे हे नागरिकांकडून निवेदने प्रत्यक्ष स्वीकारणार आहेत.
नागरिकांनी आपल्या प्रलंबित अथवा नवीन शासकीय कामांबाबतची निवेदने या अभियानाच्या माध्यमातून सादर करून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा नेते, सातारा जिल्हा दौरा समन्वयक, जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले आहे.
प्राप्त निवेदनांवर तत्काळ कार्यवाही करण्याच्या दृष्टीने पुढील दिवशी संबंधित शासकीय विभाग व कार्यालयांकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागण्यास मदत होणार असून, शासकीय कामकाजाला गती देण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.