श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या महारक्तदान शिबिरात 1781 बाटल्यांचे संकलन; स्वतःचाच विक्रम मोडून रचला नवा इतिहास

by Team Satara Today | published on : 11 August 2026


सातारा : महाराष्ट्र शासनाचा ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र’ व ‘कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड समाजभूषण’ पुरस्कार प्राप्त असणार्‍या तसेच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्‍या श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या वतीने भव्य महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ऑगस्ट क्रांतिदिन आणि संस्थेचे मार्गदर्शक आ. महेशदादा शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माने कॉलनी, सातारा येथील समाजभूषण-दलितमित्र शिवराम माने विद्यामंदिराच्या प्रांगणात हे शिबीर पार पडले. 

गतवर्षी एकाच दिवशी व एकाच ठिकाणी 1326 रक्तबाटल्या संकलित करून संस्थेने विक्रम नोंदवला होता. या वर्षी स्वतःचाच तो विक्रम मोडून तब्बल 1781 रक्तबाटल्यांचे संकलन करत संस्थेने जिल्ह्यात नवा ऐतिहासिक उच्चांक प्रस्थापित केला आहे.  या रक्तदान शिबीराचे उद्घाटन आ. महेशदादा शिंदे यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सौ. प्रियाताई शिंदे, सातारा लोकसभा संयोजक व भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुनील काटकर (तात्या), प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. सौ. अरुणाताई बर्गे आणि माजी जि. प. सदस्य संदीपभाऊ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

गेल्या 13 वर्षांपासून संस्था सातत्याने दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन करत असून दरवर्षी रक्तदात्यांच्या संख्येत वाढ होत आहे. या शिबीरात रक्तदात्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. भव्य मंडपामध्ये बालाजी ब्लड बँक साताराच्या वैद्यकीय पथकाने रात्री 9 वाजेपर्यंत खंड पडू न देता अविरतपणे रक्त संकलनाचे काम पूर्ण केले. 

विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी यासाठी संस्थेने सातारा शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ’एक विद्यार्थी - एक रक्तदाता’ ही संकल्पना राबवली होती. तसेच समाजात रक्तदानाचा प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने संस्थेच्या सर्व शाखांमध्ये आयोजित केलेल्या पोस्टर स्पर्धेतील निवडक पोस्टर्सचे प्रदर्शनही येथे भरवण्यात आले होते, ज्याची पाहणी करून मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलेचे कौतुक केले.  

या प्रसंगी आमदार महेशदादा शिंदे व सुनील काटकर (तात्या) यांचा वाढदिवसानिमित्त, तर डॉ. सौ. प्रियाताई शिंदे यांचा सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शाल व बुके देऊन विशेष सत्कार करण्यात आला. शिबीरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांना चार उपयुक्त वस्तूंचा समावेश असणारा ‘जीवनदान गौरव भेटवस्तू संच’ आणि ‘प्रमाणपत्र’ देऊन सन्मानित करण्यात आले. 

यावेळी बोलताना आ. महेशदादा शिंदे म्हणाले की, संस्थापक स्व. शिवराम माने (गुरुजी) यांनी समाजसेवेच्या उद्देशाने ही संस्था स्थापन केली असून त्यांचे सुपुत्र अतुल माने व संजीव माने हा वारसा समर्थपणे चालवत आहेत. आजचे हे शिबीर म्हणजे खर्‍या अर्थाने समाजसेवा कशी असावी, याचे उत्तम उदाहरण आहे. माने कुटुंब आणि शिक्षण संस्था परिवाराच्या पाठीशी आम्ही कायम खंबीरपणे उभे राहू.

सुनील काटकर यांनीदेखील शिबीराच्या नेटक्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त करत संस्थेचे सचिव संजीव माने यांचे कौतुक केले.  

दिवसभर चाललेल्या या महारक्तदान शिबीरास डॉ. सौ. अरुणाताई बर्गे, धनंजय चोपडे, अनिस नायकवडी यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी व विविध गावांतील सरपंचांनी भेटी दिल्या. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी राजे प्रतिष्ठान नवरात्र उत्सव मंडळ, आदर्श रणरागिणी महिला बहुउद्देशीय संस्था, नेहरू युवा मंडळ चंदननगर, शिवशक्ती क्रीडा मंडळ कोडोली, मंगलमूर्ती गणेशोत्सव मंडळ संभाजीनगर, विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ कन्हेरखेड, आजी-माजी विद्यार्थी संघ, शालेय समित्यांचे पदाधिकारी, ग्रामस्थ तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील 15 फलक हटविले; साईबाबा मंदिर ते जकातनाका परिसर अतिक्रमणमुक्त करण्यास सुरुवात
पुढील बातमी
शासकीय कामांसाठी भाजपाचे सेवा अभियान; सातार्‍यात 13 ऑगस्टला निवेदने स्वीकारली जाणार

संबंधित बातम्या