गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील 15 फलक हटविले; साईबाबा मंदिर ते जकातनाका परिसर अतिक्रमणमुक्त करण्यास सुरुवात

by Team Satara Today | published on : 11 August 2026


सातारा : सातारा शहरातील वाढत्या अतिक्रमणांविरोधात पालिकेने सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत गोडोली परिसरात मंगळवारी सकाळी धडक कारवाई करण्यात आली. साईबाबा मंदिर ते जकातनाका परिसरातील रस्त्यालगतचे अडथळे हटवून वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यात आला. कारवाईदरम्यान गोडोली चौकातील जुना जकात नाका हटविण्यात आला. तसेच कोसळण्याच्या स्थितीत असलेले जुने झाडही तातडीने हटविण्यात आल्याने संभाव्य धोका टळला.

मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांच्या नेतृत्वाखाली पाच ते सहा कर्मचार्‍यांच्या पथकाने ही कारवाई केली. रस्त्याच्या कडेला वाहतुकीला अडथळा ठरणारे लोखंडी बोर्ड व फलक हटविण्यात आले. मोहिमेच्या दुसर्‍या दिवशी सुमारे 14 ते 15 बोर्ड हटविण्यात आल्याची माहिती आहे.

शहरातील अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी आणि पादचार्‍यांची गैरसोय होत असल्याने पालिकेने संबंधित अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. अतिक्रमणे स्वतःहून हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यानंतरही अतिक्रमण कायम राहिल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

सध्या किरकोळ फलक हटविण्याची प्रक्रिया सुरू असली तरी मोठ्या अतिक्रमणांवर पालिका कधी हातोडा चालविणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. मोहीम सातत्याने राबवून शहरातील प्रमुख रस्ते व पदपथ अतिक्रमणमुक्त करण्याची मागणी होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
म्हसवडच्या बंधारा प्रकरणावरून प्रशासनाला अल्टिमेटम; दोषींवर कारवाई न झाल्यास 15 ऑगस्टला आत्मदहनाचा इशारा
पुढील बातमी
श्री जानाई मळाई शिक्षण संस्थेच्या महारक्तदान शिबिरात 1781 बाटल्यांचे संकलन; स्वतःचाच विक्रम मोडून रचला नवा इतिहास

संबंधित बातम्या