महामार्गावरील खड्डे आणि भरमसाठ टोल विरोधात साताऱ्यात १३ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआंदोलन

by Team Satara Today | published on : 11 August 2026


सातारा : पुणे बंगळूर ​ महामार्गावरील जीवघेणे खड्डे आणि अवाजवी टोल आकारणीविरोधात साताऱ्यातील १६ सामाजिक, व्यावसायिक व वैद्यकीय संस्था एकत्र आल्या आहेत. महामार्गाची दुरावस्था आणि प्रशासनाची उदासीनता याविरोधात गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

​‘राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवा आंदोलना’चे समन्वयक प्रसाद चाफेकर आणि वैद्यकीय संघटनेचे डॉ. अशोक पाटील यांनी नुकतीच आनेवाडी टोल नाक्यापर्यंत महामार्गाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान खड्ड्यांची अत्यंत निकृष्ट दर्जाची मलमपट्टी केल्याचे उघडकीस आले. भाकरी थापल्याप्रमाणे खड्डे भरल्याने रस्त्यावर धोकादायक उंचवटे तयार झाले आहेत.

​सेवा रस्त्यांची (सर्व्हिस रोड) अवस्था तर अत्यंत बिकट असून, रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांसाठी हे खड्डे जीवघेणे ठरत आहेत. दर्जेदार रस्ते देण्याऐवजी केवळ टोलवसुलीवर भर देणाऱ्या रस्ते विकास महामंडळाच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

​या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिक संघ, सीए असोसिएशन, आयएमए  व निमा  यांसारख्या विविध संस्थांनी एकत्र येत लढा उभारला आहे. चारचाकी वाहनधारकांची डोकेदुखी ठरलेल्या या टोलवाढीविरोधात सजग सातारकरांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वयक प्रसाद चाफेकर यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याने सदरबाजार भक्तीमय; वारकरी महिलांचा लक्षणीय सहभाग; टाळ-मृदंगाच्या गजराने परिसर दुमदुमला
पुढील बातमी
डॉ. प्रा. प्रतिभा रसाळ यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. प्रदान; यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन

संबंधित बातम्या