कराड येथे अपहरण, खंडणी प्रकरणातील आरोपी 30 तासांत गजाआड; तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाची कामगिरी

by Team Satara Today | published on : 11 August 2026


कराड : परस्पर जमीन व्यवहार करत असल्याच्या रागातून एकाचे जबरदस्तीने पांढर्‍या रंगाच्या कारमधून अपहरण करून, चाकूचा धाक दाखवून मारहाण करणे, महिला आरोपीसोबत अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत 10 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करणार्‍या संशयितांना कराड तालुका पोलिसांनी 30 तासांच्या आत गजाआड केले आहे.

या कारवाईत कुणाल सुदशिल चव्हाण (वय 31, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड, सध्या रा. वडकी, पुणे) याच्यासह त्याच्या दोन पुरुष व एका महिला सहकार्‍यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे.  कराड तालुका पोलीस ठाण्यात 8 ऑगस्ट रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

तक्रारदार हे कोपर्डे हवेली येथे असताना आरोपींनी संगनमत करून त्यांना बळजबरीने चारचाकी गाडीत घातले आणि कोपर्डे हवेली येथून कराड-सुली येथे नेले. ’तू परस्पर जमिनीचे व्यवहार करतोस, तुला आता दाखवतो’ असा दम मारत चाकू दाखवून जीवेे मारण्याची धमकी दिली. तसेच तक्रारदारास बेदम मारहाण केली. सुर्ली या ठिकाणी नेऊन एका महिला आरोपीसोबत तक्रारदाराचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढण्यात आले. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन 10 हजार रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती.  

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तयार करण्यात आले.  

तपासादरम्यान तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पुणे येथे असल्याचे समजले. त्यानुसार डी.बी. स्टाफने तात्काळ पुण्याकडे रवाना होऊन पुणे येथील वडकी परिसरातून कुणाल चव्हाण व त्याच्या दोन पुरुष सहकार्‍यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी कुणाल चव्हाण, दोन पुरुष आणि एका महिला साथीदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे.  

ही कामगिरी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, कराडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भुजबळ, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक येळवे, पोलीस हवालदार सचिन निकम, पोलीस नाईक सागर शिवदास, किरण बामणे, पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल गाडे, विजय यादव आणि मयुर देशमुख यांनी पार पाडली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिरवळ गावाजवळ भरधाव कार दुभाजकावर आदळली, पलटी झाल्यानंतर ट्रकला धडकली; पुणे जिल्ह्यातील चार तरुण ठार
पुढील बातमी
नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याने सदरबाजार भक्तीमय; वारकरी महिलांचा लक्षणीय सहभाग; टाळ-मृदंगाच्या गजराने परिसर दुमदुमला

संबंधित बातम्या