सातारा : आयुष्याच्या कठीण वळणावर जेव्हा आपले म्हणणारे कोणीच उरत नाही, तेव्हा माणुसकीचा हात पुढे करणारी व्यक्तीच खऱ्या अर्थाने आधार ठरते. अशाच माणुसकीचा प्रत्यय बोरगाव पोलिसांनी दिला आहे. गेल्या दोन वर्षांपासून बोरगाव येथे भाड्याने राहणाऱ्या ५२ वर्षीय मंगल शंकर मोहिते या अनाथ व आजारी महिलेच्या मदतीला बोरगाव पोलिस धावून गेले. यामुळे त्यांच्या आयुष्याला कायमस्वरूपी निवाऱ्याचा आधार मिळाला.
मंगल मोहिते या नागठाणे (ता. जि. सातारा) येथील रहिवासी असून, मोलमजुरी करून त्या आपला उदरनिर्वाह करीत होत्या. जवळचे नातेवाइक नसल्याने सुख-दुःखात सोबत करणारे कोणीही त्यांच्याकडे नव्हते. काही दिवसांपूर्वी त्या आजारी पडल्या. आजारपणामुळे त्यांच्या कंबरेखालील शरीर लुळे पडल्याने त्यांना उठता- बसताही येत नव्हते. अशा अवस्थेत त्यांची काळजी घेण्यासाठीही कोणी नसल्याने त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती.
ही माहिती बोरगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुले यांना मिळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पोलिस कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठविले. पोलिसांनी मंगल मोहिते यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केले. केवळ उपचार करून त्यांना पुन्हा एकटे सोडणे योग्य ठरणार नाही, हे लक्षात घेऊन पोलिसांनी वृद्धेच्या भविष्यासाठी पुढाकार घेतला.
वाई तालुक्यातील वेळे येथील यशोधन ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मंगल मोहिते यांच्या आजारपणाची, निराधार परिस्थितीची सविस्तर माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पुढील उपचार, देखभाल आणि सुरक्षित निवाऱ्यासाठी त्यांना यशोधन ट्रस्टमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, ट्रस्टच्या वतीने त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. कायद्याच्या रक्षणासोबतच माणुसकीचेही रक्षण करता येते, हे बोरगाव पोलिसांनी या कृतीतून दाखवून दिले आहे.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी प्रशांत तुकाराम हुले, पोलिस हेडकॉन्स्टेबल विजय म्हेत्रे, महिला पोलिस नाईक मनीषा म्हेत्रे, पोलिस कॉन्स्टेबल विशाल जाधव, महिला पोलिस कॉन्स्टेबल पूजा शिंदे, चालक प्रदीप पवार यांनी संबंधित महिलेला सर्वतोपरी मदत केली.
माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधा
मंगल मोहिते यांच्या नातेवाइकांचा शोध बोरगाव पोलिसांकडून सुरू असून, नातेवाइक आढळल्यास त्यांना तातडीने माहिती देण्यात येणार आहे. अशा निराधार व्यक्तींबाबत नागरिकांना माहिती असल्यास त्यांनी बोरगाव पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.