डीजे डान्सच्या नावाखालील अश्लील नृत्य बंद करा; कठोर कारवाईची मेघराज राजेभोसले आणि अभिनेत्री टीना शर्मा घेवारे यांची मागणी

by Team Satara Today | published on : 11 August 2026


पुणे : डीजे डान्स आणि डीजे लावणीच्या नावाखाली सुरू असलेल्या अशोभनीय कार्यक्रमांना तातडीने आळा घालावा. लावणी ही महाराष्ट्राची समृद्ध लोककला असून, तिच्या नावाखाली अश्लील नृत्य आणि अशोभनीय सादरीकरण करून कलेची बदनामी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी  अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले आणि अभिनेत्री टीना शर्मा घेवारे यांनी पत्रकार परिषदेत केली.

काही डीजे डान्स कार्यक्रमांमध्ये अशोभनीय अंगविक्षेप, पैशांची उधळण, प्रेक्षकांना थेट स्टेजवर बोलावणे तसेच महिला कलाकारांना अवघडल्यासारखे वाटेल असे सादरीकरण होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. विशेषतः अशा कार्यक्रमांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग हा गंभीर विषय असून, प्रशासनाने महिला व बालसुरक्षेच्या दृष्टीनेही या प्रकारांकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी कलावंतांनी केली.

कलाकारांना संधी, सन्मान द्या

राजेभोसले म्हणाले, लावणीमध्ये अभिनय, नृत्य, भावभावना आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सुंदर संगम आहे. पारंपरिक आणि गुणवंत लावणी कलाकारांना योग्य व्यासपीठ, सन्मान, काम आणि रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजेत. अश्लील कार्यक्रमांना आळा घालताना अस्सल लोककलेच्या संवर्धनासाठी शासनाने ठोस उपाययोजना कराव्यात. टीना शर्मा घेवारे यांनीही अश्लील सादरीकरणामुळे लावणी कलेची प्रतिमा मलिन होत असल्याचे सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या ताफ्यातील कारला आंबेगावजवळ अपघात, बीडचा कार्यकर्ता जखमी
पुढील बातमी
कोणी नाही, शरीर साथ देईना; बोरगाव पोलिसांकडून मायेचा हात, वृद्धेला मिळाला निवाऱ्याचा आधार

संबंधित बातम्या