मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या ताफ्यातील कारला आंबेगावजवळ अपघात, बीडचा कार्यकर्ता जखमी

by Team Satara Today | published on : 11 August 2026


विटा : कडेगावहून विट्याकडे येणाऱ्या मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या ताफ्यातील कारला पाठीमागून भरधाव बसने धडक दिली. या अपघातात किरण नारायण भगत (वय २८, रा. बीड) हा कार्यकर्ता जखमी झाला. आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास कडेगाव तालुक्यातील आंबेगाव हद्दीत हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच जरांगे-पाटील यांनी ताफ्यातून गाडी पाठीमागे घेऊन स्वतः जखमी भगत यांना विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील हे गेल्या तीन दिवसांपासून सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी रात्री उशिरा कडेगाव येथील सभा संपल्यानंतर त्यांनी कडेगावातच मुक्काम केला. तिथून मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजता ते विटाकडे येण्यास निघाले. कडेपूर व शिवणी फाटा येथे स्वागत झाल्यानंतर त्यांच्या कारचा ताफा विटेच्या दिशेने रवाना झाला.

त्यांच्या कारचा ताफा आंबेगावजवळ आल्यानंतर त्यांच्या ताफ्यातील कारला (क्र. एम. एच. २३-बी.के. ३७७७) पाठीमागून विट्याकडे जाणाऱ्या बसने (क्र. एम. एच.११-बी. एल. ९३९१) जोराची धडक दिली. या धडकेनंतर मोटार पोलिस गाडीवर जाऊन आदळली. अपघातात गाडीतील किरण नारायण भगत हे जखमी झाले. त्यांच्या कमरेला व मणक्याला जोराचा मार लागला आहे.

ताफ्यातील कारला अपघात झाल्याचे समजताच ताफ्यात पुढे असलेल्या मनोज जरांगे-पाटील यांनी तातडीने त्यांची गाडी पाठीमागे वळवून जखमी भगत यांना स्वतःच्या गाडीतून विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिथून जखमी भगत यांना विट्यातीलच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सध्या जखमी भगत यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती उत्तम आहे.

उपचारानंतर कार्यकर्ता दौऱ्यात सामील होणार : मनोज जरांगे पाटील

कडेगावहून विटाकडे येणाऱ्या बसने पाठीमागून कारला धडक दिल्याने आमचा बीडचा कार्यकर्ता किरण भगत जखमी झाला आहे. त्याला मी स्वतः माझ्या गाडीतून पहिल्यांदा रुग्णालयात आणले. त्यांच्या कमरेला व मणक्याला दुखापत झाली असून तो आता सुरक्षित आहे. उद्यापर्यंत त्याला डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो पुन्हा आमच्या दौऱ्यात सहभागी होईल, असे मनोज जरांगे-पाटील यांनी सांगितले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अभिजीत दीपकेने केली नव्या आंदोलनाची घोषणा; 15 ऑगस्टपासून कॉकरोच जनता पार्टीची देशव्यापी मोहीम सुरू करणार
पुढील बातमी
डीजे डान्सच्या नावाखालील अश्लील नृत्य बंद करा; कठोर कारवाईची मेघराज राजेभोसले आणि अभिनेत्री टीना शर्मा घेवारे यांची मागणी

संबंधित बातम्या