सातारा : विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करणार्या स्कूल व्हॅन व बसचालकांच्या विविध अडचणी शासनस्तरावर प्रभावीपणे मांडण्यासाठी विद्यार्थी वाहतूकदारांनी संघटित शक्ती उभी करणे गरजेचे आहे. एकजुटीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास अनेक प्रलंबित प्रश्नांना निश्चितच मार्ग मिळेल, असे प्रतिपादन अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ व महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी यांनी केले.
स्कूल व्हॅन व बसच्या वयोमर्यादेत पाच वर्षांची वाढ मिळवून देण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार्या मान्यवरांच्या सत्कारानिमित्त अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघ संलग्न सातारा विद्यार्थी सेवा संस्थेच्या वतीने पार्टे हिल रिसॉर्ट येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दळवी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक तथा गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन राजेंद्र चोरगे होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थी वाहतूकदारांच्या प्रश्नांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थी वाहतूक ही केवळ व्यवसायाची बाब नसून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी निगडित महत्त्वाची जबाबदारी आहे, असे मत राजेंद्र चोरगे यांनी व्यक्त केले. पालक आपल्या मुलांना सुरक्षितपणे शाळेत ने-आण करण्याची जबाबदारी विद्यार्थी वाहतूकदारांवर सोपवतात. त्यामुळे या व्यवसायाकडे समाजानेही सन्मानाने पाहणे आवश्यक आहे. विद्यार्थी वाहतूकदारांनीदेखील आपल्या कार्याचे महत्त्व ओळखून व्यवसायाची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
सातारा विद्यार्थी सेवा संस्थेच्या कामकाजाचे कौतुक करताना उदय दळवी यांनी पदाधिकारी आणि सदस्यांनी परस्पर समन्वय ठेवून भविष्यातील कामाचे नियोजन करण्याची गरज व्यक्त केली. संस्थेची सध्याची वाटचाल समाधानकारक असून संघटित ताकद आणि योग्य नियोजनाच्या जोरावर सातारा विद्यार्थी सेवा संस्था भविष्यात महाराष्ट्रातील आदर्श संस्था ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघाचे उपाध्यक्ष मनोज पावशे, महासचिव घनःश्याम सांडीम, सचिव सिद्दीक शेख, प्रसिद्धी प्रमुख योगेश कांबळे, खजिनदार रंगनाथ जाधव आणि कार्याध्यक्ष संपत पाचरणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सातारा विद्यार्थी सेवा संस्थेचे अध्यक्ष उत्तम भोसले, उपाध्यक्ष अभिजित शिंदे, सचिव दीपक गायकवाड यांच्यासह संचालक मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. सत्कार समारंभानंतर स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.