विद्यार्थ्यांची वेळ टळली, अनर्थ टळला ; पोवई नाका परिसरातील सेंट पॉलच्या कॅन्टीनमध्ये आगीचा भडका

by Team Satara Today | published on : 10 August 2026


सातारा : पोवई नाका परिसरातील सेंट पॉल स्कूलच्या कॅन्टीनमध्ये सोमवारी दुपारी अचानक आग भडकली. कॅन्टीनमधून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा दिसू लागल्याने शाळा परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, शाळा सुटल्यानंतर ही घटना घडल्याने विद्यार्थी आवारात नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास कॅन्टीनमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आले. कॅन्टीनमधून धूर येत असल्याचे लक्षात येताच शाळेतील शिक्षकांनी तातडीने अग्निशमन दलाशी संपर्क साधला. काही वेळातच अग्निशमन दलाचे जवान बंबासह घटनास्थळी दाखल झाले.

कॅन्टीनमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. त्यामुळे आगीची झळ कॅन्टीनलगतच्या परिसरासह शाळेच्या मुख्य इमारतीपर्यंत पोहोचण्याचा धोका टळला.

या दुर्घटनेत कॅन्टीनमधील विविध साहित्य जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानीची नेमकी रक्कम अद्याप स्पष्ट झालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार विद्युत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

विशेष म्हणजे, दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शाळा सुटली होती. त्यामुळे आग लागली त्यावेळी शाळेत विद्यार्थी नसल्याने संभाव्य जीवितहानी टळली. अन्यथा विद्यार्थ्यांच्या गर्दीच्या वेळी अशी घटना घडली असती तर परिस्थिती गंभीर बनण्याची शक्यता होती. दरम्यान, शाळेच्या परिसरात आग लागल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत केलेल्या कारवाईमुळे आग अधिक पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यातील हजारो कुटुंबांसाठी यंदाचा स्वातंत्र्यदिन दिलासादायक ठरणार; हजारो कुटुंबांच्या ‘घराच्या हक्कावर’ ग्रामसभेची मोहोर, ९४ हजार १०७ घरकुल लाभार्थी निश्चित
पुढील बातमी
विद्यार्थी वाहतूकदारांच्या हक्कांसाठी एकजूट हवी - महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी; संघटित प्रयत्नांतून प्रश्‍न सोडविण्याचे आवाहन

संबंधित बातम्या