सातारा : संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने सातारा शहरातील शाळां- महाविद्यालयांतील १०वी व १२वीतील सर्व प्रवर्गातील सुमारे शंभर दीडशे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ येत्या रविवारी१६ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हाॅल मध्ये पुणे महसूल विभागाचे अतिरिक्त आयुक्त तुषार ठोंबरे व श्रीरामपूर येथील प्राचार्य डॉ. संजय कांबळे यांच्या हस्ते होणार आहे,अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश इंजे व संघटक दिनकर झिंब्रे यांनी दिली.
विद्यार्थ्यांना भावी आयुष्यातील उज्वल वाटचालीसाठी करिअरच्या संधीबाबत मार्गदर्शन व प्रेरणा देण्यासाठी संबोधी प्रतिष्ठानचे वतीने गेले अठरा वर्षांपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.यावर्षी शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांना शहीद कॉम्रेड पानसरे यांचे' शिवाजी कोण होता?' तसेच भारतीय संविधान अशी मौलिक पुस्तके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
यावर्षी सातारा शहरातील विविध तीस शाळा महाविद्यालयांनी उत्तम गुण संपादन केलेल्या एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी व खुल्या अशा विविध प्रवर्गातील 200 विद्यार्थ्यांची नावे सत्कारा साठी कळवून उत्तम प्रतिसाद दिला आहे. प्रत्येक शाळा महाविद्यालयातील सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात येणारआहे.
या गौरव समारंभास विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांनी उपस्थित रहावे असे आवाहन, उपाध्यक्ष प्रा. प्रशांत साळवे,सहकार्यवाह डॉ. सुवर्णा यादव , कोषाध्यक्ष यशपाल बनसोडे, विश्वस्त डॉ. जयपाल सावंत , अनिल बनसोडे, केशव कदम, प्रकाश गायकवाड, अशोक कांबळे व अशोक भोसले यांनी केले आहे.