सातारा जिल्हा बँक निवडणुकीपूर्वी मुंबईतील निवासस्थानी शरद पवार-शंभूराज देसाई यांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

by Team Satara Today | published on : 10 August 2026


सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. त्यातच सातारा जिल्हा बँकेची निवडणूक लवकरच होत असल्याने त्या अनुषंगानेही दोघांत बोलणी झाल्याबाबत राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. पण, पालकमंत्री देसाई यांच्याकडून ही सदिच्छा भेट होती, असे समाजमाध्यमांवर स्पष्ट करण्यात आले आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक दिवाळीच्या दरम्यान होत आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेचे चांगले सूत जुळले होते. भाजपविरोधात राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेने पवित्रा घेतला होता. त्यातच आता पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर सातारा जिल्ह्यात राजकीय चर्चा सुरू झाली. जिल्हा बँकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र येण्याची ही तयारी असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. त्यामुळे या भेटीकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जात आहे. पण, पालकमंत्री देसाई यांनी समाजमाध्यमांवर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेण्याचा योग आला. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘दाैलत’ हे पुस्तक त्यांना भेट देताना मन भरून आलं. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या आठवणींना दिलेला उजाळा म्हणजे माझ्यासाठी केवळ संवाद नव्हता, तर एका समृद्ध राजकीय परंपरेचा आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा पुन्हा अनुभव होता, असे पालकमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न; अफवांवर विश्वास ठेवू नका, मनोज जरांगे-पाटील यांचे आवाहन, कवठेमहांकाळ येथे सभा
पुढील बातमी
मलकापूर येथील डुबलनगर परिसरात कौटुंबिक वादातून पत्नीचा चाकूने वार करून खून; पती पोलिसांच्या ताब्यात

संबंधित बातम्या