कास पठारावर दरीत कोसळलेला तीन लाख रुपये किमतीचा ड्रोन कॅमेरा शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने सुरक्षितपणे बाहेर काढला; रेस्क्यू टीमला तीन हजार रुपये रोख बक्षीस

by Team Satara Today | published on : 10 August 2026


बामणोली : कास पठाराच्या निसर्गसौंदर्याचे चित्रीकरण करण्यासाठी उडविलेला तब्बल तीन लाख रुपये किमतीचा ड्रोन कॅमेरा दरीत कोसळल्याची घटना रविवारी घडली. दोनशे ते तीनशे फूट खोल दरीत गर्द झाडीत अडकलेला हा ड्रोन कॅमेरा शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमच्या जवानांनी तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर सुरक्षितपणे बाहेर काढला.

कास परिसरात दरवर्षी हजारो पर्यटक निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येतात. रविवारी कर्नाटकातून आलेल्या पर्यटकांनी कास परिसराचे निसर्गसौंदर्य टिपण्यासाठी ड्रोन कॅमेरा उडविला होता. मात्र, काही वेळातच ड्रोनचा संपर्क तुटून तो परिसरातील खोल दरीत जाऊन पडला. तीन लाखांचा कॅमेरा दरीत पडल्याने पर्यटकांची चिंता वाढली. परिसरातील नागरिकांकडून माहिती मिळाल्यानंतर पर्यटकांनी मदतीसाठी शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमशी संपर्क साधला.

माहिती मिळताच टीमचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. ड्रोन दरीतील गर्द झाडीत अडकला असल्याचे आढळून आले. सुमारे दोनशे ते तीनशे फूट खोल दरीत दोराच्या सहाय्याने उतरत रेस्क्यू टीमच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली. तब्बल तासभर प्रयत्न केल्यानंतर झाडीत अडकलेला ड्रोन शोधण्यात त्यांना यश आले.रेस्क्यू टीमने ड्रोन सुरक्षितपणे बाहेर काढून संबंधित पर्यटकांच्या स्वाधीन केला. तीन लाख रुपये किमतीचा ड्रोन परत मिळाल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त केले.

रेस्क्यू टीमला तीन हजार रुपये रोख बक्षीस

या मदतीबद्दल त्यांनी रेस्क्यू टीमला तीन हजार रुपये रोख बक्षीस दिले. या मोहिमेत चंद्रसेन पवार, सिद्धार्थ गायकवाड, आदित्य पवार, ऋषी रंकाळे आणि गणेश निपाणे यांनी सहभाग घेतला. संकट अथवा आपत्कालीन परिस्थितीत सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विविध भागांत शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमकडून तत्परतेने मदतकार्य केले जाते. कास येथील या मोहिमेतही टीमने दाखविलेल्या धाडसाचे आणि तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मालकास फसवून चालक ट्रक घेऊन परागंदा
पुढील बातमी
कास धरणाचे ओटीभरण; आगामी काळात सातारा शहरासह हद्दवाढ भागाला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा पालिकेचा संकल्प - नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष ॲड. दत्तात्रय बनकर यांची माहिती

संबंधित बातम्या