कास पठारावरील गणेश खिंडीत ड्रोन दरीत अडकला; शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने केली तत्पर मदत

by Team Satara Today | published on : 09 August 2026


सातारा : कास पठारावरील गणेश खिंड परिसरात शूटिंगसाठी आलेल्या कर्नाटक येथील पर्यटकाचा मौल्यवान ड्रोन नियंत्रण सुटल्याने दरीतील झाडावर अडकला. याची माहिती मिळताच श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि अथक प्रयत्नांनंतर ड्रोन सुरक्षितपणे शोधून पर्यटकाच्या ताब्यात दिला.

आज दुपारी सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास कर्नाटक येथील काही पर्यटक कास पठार, गणेश खिंड परिसरात शूटिंगसाठी आले होते. शूटिंग सुरू असताना ड्रोनवरील नियंत्रण सुटल्याने तो दरीत असलेल्या एका झाडावर जाऊन अडकला. ड्रोन महागडा आणि मौल्यवान असल्याने पर्यटकांनी तातडीने रेस्क्यू टीमशी संपर्क साधला.

माहिती मिळताच श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमचे जवान घटनास्थळी पोहोचले. दरीची भौगोलिक परिस्थिती आणि अडचणींचा सामना करत टीमने शोधमोहीम राबवून झाडावर अडकलेला ड्रोन शोधून सुरक्षितपणे बाहेर काढला. ड्रोन मिळाल्याने संबंधित पर्यटकांनी रेस्क्यू टीमचे आभार मानले.

या मदतकार्यात चंद्रसेन पवार, सिद्धार्थ गायकवाड, आदित्य पवार, ऋषी रंकाळे आणि गणेश निपाणे यांनी सहभाग घेतला.

या जवानांच्या तत्परता, धाडस आणि उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे यांनी रेस्क्यू टीमच्या जवानांना 3 हजार रुपये बक्षीस देऊन त्यांचा गौरव केला. त्यांच्या या कामगिरीचे परिसरातून कौतुक होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
क्रांती दिनानिमित्त हुतात्मा स्मारकासह शहीद कर्नल संतोष महाडिक स्मारकास अभिवादन
पुढील बातमी
महिला नगरसेविकांच्या हस्ते कास धरणाचे जलपूजन आणि पारंपारिक पद्धतीने ओटी भरण

संबंधित बातम्या