सातारा : खंडाळा तालुक्यातील बावडा येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुरेश मारुती पवार यांना साखर उद्योगातील उल्लेखनीय संशोधन कार्याबद्दल 'आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स फॉर शुगर इंडस्ट्री रिसर्च' हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे येथील हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरियट येथे आयोजित 'डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन'च्या (DSTA) वार्षिक अधिवेशनात हा सोहळा पार पडला. साखर उद्योगातील मान्यवर, कारखान्यांचे संचालक, तंत्रज्ञ व शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत डॉ. पवार यांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
डॉ. पवार यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रात प्रदीर्घ काळ सेवा बजावली आहे. त्यांनी 'फुले ०२६५', 'को. ८६०३२', 'एमएस १०००१', 'कोएम-११०८२', 'फुले १४०८२', 'फुले १५०१२' आणि 'फुले १५०००६' या ऊसाच्या सुधारित वाणांच्या संशोधनात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या या प्रयोगांमुळे ऊसाचे उत्पादन, गुणवत्ता आणि साखर उताऱ्यात मोठी वाढ झाली असून, त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकरी आणि साखर उद्योगाला झाला आहे.
संशोधन क्षेत्रातील या उल्लेखनीय योगदानाबद्दल बावडा परिसरासह जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातून डॉ. सुरेश पवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.