सातारा : प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारणे, ठरावीक ठिकाणी जाण्यास नकार देणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे तसेच रिक्षांची कागदपत्रे आणि फिटनेस अद्ययावत न ठेवण्याच्या तक्रारींची वाहतूक शाखेने गंभीर दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर सातारा शहरात वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) संयुक्त विद्यमाने रिक्षांची विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.
शहरातील विविध रिक्षा थांब्यांच्या प्रतिनिधींची बैठक शनिवारी (दि. ८) सातारा शहर वाहतूक शाखेच्या वतीने घेण्यात आली. यावेळी रिक्षाचालकांच्या विविध अडचणी, वाहतुकीतील समस्या आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवेसंदर्भात चर्चा करण्यात आली. रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करून प्रवाशांना सुरक्षित आणि सौजन्यपूर्ण सेवा देण्याचे आवाहन करण्यात आले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी रिक्षाचालकांशी संवाद साधताना रिक्षा आरटीओच्या नियमांनुसार सुस्थितीत ठेवण्याच्या सूचना दिल्या. वाहनाची आवश्यक कागदपत्रे अद्ययावत असणे, वेळेत पासिंग करून घेणे तसेच फिटनेससह इतर कायदेशीर बाबींची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कागदपत्रांसह फिटनेसचीही तपासणी
आगामी विशेष तपासणी मोहिमेत रिक्षांची कागदपत्रे, फिटनेस, पासिंग आणि अन्य आवश्यक बाबी तपासण्यात येणार आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशारा वाहतूक शाखेने दिला आहे. त्यामुळे कागदपत्रे अपूर्ण असलेल्या किंवा नियमांचे पालन न करणाऱ्या रिक्षाचालकांना आता खबरदारी घ्यावी लागणार आहे.
प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वर्तनाचे आवाहन
रिक्षा हे शहरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचे प्रमुख साधन आहे. त्यामुळे प्रवाशांना योग्य आणि सुरक्षित सेवा मिळणे अपेक्षित आहे. काही रिक्षाचालकांकडून जादा भाडे आकारणे, प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यास नकार देणे अथवा मनमानी भाडे मागणे, अशा तक्रारी येत असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले.
प्रवाशांशी वाद घालण्याऐवजी सौजन्यपूर्ण वर्तन करावे आणि शासनाने निश्चित केलेल्या नियमांनुसारच भाडे आकारावे, अशा सूचना रिक्षाचालकांना देण्यात आल्या.
रिक्षा थांब्यांवरील बेशिस्त पार्किंगही रडारवर
शहरातील काही रिक्षा थांब्यांवर रिक्षांची अनियंत्रित पार्किंग होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. रिक्षाचालकांनी निर्धारित ठिकाणीच वाहने उभी करावीत. प्रवाशांची चढ-उतार करताना रस्त्यावरील अन्य वाहनांना अडथळा होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.