बामणोली येथील त्रिवेणी संगम परिसरात परदेशी पाहुणे; जलाशयात बोटिंग करताना जवळून पक्षी पाहण्याची संधी

by Team Satara Today | published on : 08 August 2026


सातारा : निसर्गसौंदर्याने नटलेल्या बामणोली येथील मजरे शेंबडीच्या त्रिवेणी संगमाच्या नयनरम्य परिसरात परदेशी पाहुणे अर्थात ‘फ्लेमिंगो’ (रोहित) पक्ष्यांचे आगमन झाले आहे. शिवसागर जलाशयाच्या विस्तीर्ण पात्रात गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या या पक्ष्यांचे थवेच्या थवे दाखल झाल्याने संपूर्ण परिसर जणू गुलाबी रंगात न्हाऊन निघाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे बामणोली परिसरातील निसर्गसौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. धुक्याची चादर, सभोवतालचे हिरवेगार डोंगर आणि संथ वाहणाऱ्या पाण्यात स्वैर विहार करणारे फ्लेमिंगो पक्षी असा मनमोहक नजारा सध्या पाहायला मिळत आहे. फ्लेमिंगोंच्या आगमनाची बातमी पसरताच हे निसर्गदृश्य कॅमेऱ्यात टिपण्यासाठी पक्षी निरीक्षकांची आणि पर्यटकांची गर्दी होत आहे.

पक्ष्यांच्या आगमनामुळे स्थानिक बोट व्यावसायिकांना मोठा फायदा होत असून, जलाशयात बोटिंग करताना जवळून पक्षी पाहण्याची संधी पर्यटकांना मिळत आहे. त्यामुळे हॉटेल आणि इतर लहान-मोठ्या व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, पक्षी संवेदनशील असल्याने पर्यटकांनी सुरक्षित अंतर ठेवावे व गोंधळ घालू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोयना नदीपात्रात व शिवसागर जलाशयात मिळणारे मुबलक खाद्य आणि समृद्ध जंगलसंपदेमुळे शिवसागर जलाशयात या वर्षी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगोंचे थवे दाखल झाले आहेत. अनुकूल परिस्थिती राहिल्यास हे पक्षी नियमितपणे या परिसरात येत राहतील.- विजय बाठे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वन्यजीव विभाग, बामणोली

मजरे शेंबडी, बामणोलीच्या (ता. जावली) त्रिवेणी संगमावर तब्बल ५०० ते ६०० ‘फ्लेमिंगो’ (रोहित पक्षी) अवतरले असून, जलाशय गुलाबी रंगाने उजळून निघाला आहे. हे पक्षी साताऱ्यात महाबळेश्वर, बामणोलीचे शिवसागर जलाशय आणि उरमोडी धरण क्षेत्रात व मायणी येथे हिवाळा व उन्हाळ्याच्या सुरुवातीला (नोव्हेंबर ते मे) प्रामुख्याने आढळतात. ते गुजरातमधील ‘कच्छचे रण’, तसेच स्थानिक स्थलांतरातून सोलापूरच्या उजनी धरणावरून अन्नाच्या शोधात येथे येतात.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दहशतवादी संघटनांशी संबंधित ११४ साहित्य सामग्रीवर महाराष्ट्र सरकारने घातली बंदी; राष्ट्रीय सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुढील बातमी
फुलांची रंगीबेरंगी दुनिया लवकरच कास पठारावर अवतरणार; पांढऱ्याशुभ्र चवर फुलांचे आगमन

संबंधित बातम्या