पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती, दुसरा हप्ताही लवकरच वितरीत करण्यात येणार

by Team Satara Today | published on : 07 August 2026


मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना घोषित केली होती. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी आषाढीला जाहीर केली होती. कुठल्याही अर्जाविना आधार कार्डच्या सहाय्याने शेतकऱ्यांची खाली रिक्त करायचे काम हाती घेतले होते. आज जवळपास ५ हजार २९ कोटी रूपयांचा पहिला हफ्ता ६ लाख २२ जार २०७ शेतकऱ्यांच्या खात्यात गेला आहे. ही खाती रिक्त करण्यात आली आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. या यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आता कर्जमाफीचा ५ हजार कोटींचा पहिला हप्ता वितरित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज (७ ऑगस्ट) पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे. तसेच कर्जमाफी योजनेचा दुसरा हप्ताही लवकरच वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे.

“आपल्या सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना घोषित केली होती. या योजनेच्या माध्यमातून आषाढी वारीच्या दिवशी आपण पहिली यादी जाहीर केली. ही यादी आपण सर्व ग्रामपंचायतीला पाठवली होती. यामध्ये शेतकऱ्यांनी फक्त केवायसी करायची होती. इतर कोणत्याही गोष्टींची गरज नाहीये. आज जवळपास ५ हजार २९ कोटी रुपये आपण कर्जमाफीचा पहिला हप्ता ६ लाख २२ हजार २०७ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला आहे, त्यामुळे आता शेतकऱ्यांचे हे खाते नील झालेले आहेत”, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितली.

“मध्यंतरी काही गैरसमज असे झाले होते की, काही शेतकऱ्यांच्या नावावर जास्त कर्ज दिसत होतं. मात्र, त्यांच्या नावावर पैसे कमी जमा झाले अशा तक्रारी होत्या. मात्र, जे त्यावरील व्याज होतं, त्या व्याजामुळे ते जास्त दिसत होतं. बँकांनी ते व्याज रद्द केल्यामुळे आता खात्यातील पैसे आणि सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात भरलेले पैसे हे सारखे असल्यामुळे शेतकऱ्यांची बँक खाती नील झाले आहेत. आता शेतकऱ्यांच्या खात्यांची जशी-जशी केवायसी होईल, तसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील. अजून जवळपास १८ लाख खात्यांची प्रक्रिया सुरू आहे आणि १२ लाख खाते हे बँकांना परत पाठवलेले आहेत, त्यात बँकांनी चुका केलेल्या आहेत. एका आठवड्यात त्यामध्येही सुधारणा केल्या जातील”, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितली.

कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया किती दिवसांत होईल?

“शेतकरी कर्जमाफी योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची ही संपूर्ण प्रक्रिया एका महिन्यात होईल. मात्र, आपला जुना असा अनुभव असा आहे की आपलं जवळपास ८० टक्के काम हे एका महिन्यात होतं. मात्र, २० टक्के कामाला वेळ लागतो. यामध्ये काही शेतकऱ्यांची अडचण असते, तर कुठे बँकांची अडचण असते. काही ठिकाणी आणखी काही अडचणी असतात. त्यामुळे कधी-कधी जास्त वेळ लागतो”, असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं आहे.

शेतकरी कर्जमाफी किती टप्प्यांत?

“पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीचे आम्ही दोन टप्पे केले आहेत. पहिल्या टप्प्यांत आम्ही पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे सर्व पैसे भरत आहोत आणि दुसऱ्या टप्प्यांत आम्ही प्रोत्साहनपर लाभार्थी शेतकऱ्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहोत. तसेच कोणत्याही शेतकऱ्यांवर सिव्हीलची अट लागणार नाही”, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
छत्रपती शाहू महाराजांचे राजवेशातील दुर्मिळ चित्र प्रकाशात; ऐतिहासिक स्मृतींना उजाळा, इतिहास अभ्यासक निलेश झोरे यांची माहिती
पुढील बातमी
जेन झींना मोहन भागवत यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही - प्रियांका गांधींची प्रतिक्रिया; अमित शाहांवरही जोरदार टीका

संबंधित बातम्या