सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काँग्रेसला पूर्ण आदर, ‘गुंगी गुडिया’ नाही, हे त्यांनी सिद्ध करावे : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

by Team Satara Today | published on : 07 August 2026


कराड : ‘माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही एकेकाळी ‘गुंगी गुडिया’ असे संबोधले जात होते. हा काही अपमानास्पद शब्द नाही. सुनेत्रा पवार यांच्याबद्दल काँग्रेसला पूर्ण आदर आहे. ‘त्या गुंगी गुडिया’ नाहीत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने आपण लढवय्या आहोत, दुर्गा आहोत, झाशीची राणी आहोत, हे सिद्ध करावे,’ असे मत काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

बुधवारी रात्री ते कराड दौऱ्यावर आले असताना माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सुनेत्रा पवार यांच्याबाबत झालेल्या वादावरही भाष्य केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या छायाचित्राला जोडे मारण्याचे आंदोलन करण्यात आल्याबाबत विचारले असता, वडेट्टीवार म्हणाले, ‘ज्यांना खरोखर जोडे मारायला हवेत, त्यांच्यापर्यंत जाण्याची हिंमत यांच्यात नाही. सत्तेची झूल पांघरून स्वतःला वाघ समजणाऱ्यांनी आधी ती झूल काढावी, मग ते वाघ आहेत की कोल्हे, हे जनतेला दिसेल.’

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, ‘त्यांच्यावर अन्याय होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. एवढी मोठी राजकीय कारकीर्द असूनही त्यांना राजकारणातून संन्यास घ्यावा लागेल, अशी भावना व्यक्त करावी लागत असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपमध्ये पक्षासाठी आयुष्य घालवणाऱ्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचा आवाज दाबला जातो, असा आरोप करत त्यांनी पंकजा मुंडे यांना काँग्रेसमध्ये येण्याचे खुले निमंत्रण दिले. त्या काँग्रेसमध्ये आल्यास त्यांना राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनवण्याची संधी देऊ, असे वक्तव्यही त्यांनी केले.

तर ‘त्या’ दोघांना हटवावे लागेल..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होण्याच्या चर्चेवर छेडले असता मराठी माणूस पंतप्रधान झाला तर आनंदच आहे. मात्र, त्यासाठी आधी दिल्लीतील त्या दोन नेत्यांना हटवावे लागेल, तेव्हा खरा आनंद होईल, असे म्हणत वडेट्टीवार यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावरही निशाणा साधला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
आमदार प्रवीण दरेकरांनी बावनकुळेंची पत्रे पाहावीत, उगाच डोके लावू नये; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
पुढील बातमी
माण तालुक्यातील तरस संवर्धन कार्याला जागतिक मान्यता; परिसरातील वन्यजीव संवर्धनाला गती मिळणार

संबंधित बातम्या