तासवडे व मलकापुरात मुदत संपलेल्या बिअरची विक्री, विनापरवाना गूळ रिपॅकिंगवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

by Team Satara Today | published on : 06 August 2026


कराड : अन्न व औषध प्रशासनच्या कराड येथील पथकाने बुधवारी मलकापूर शहर व तासवडे एमआयडीसी परिसरात छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत मलकापूर परिसरातील दोन हॉटेल्सच्या बिअर बारमध्ये मुदत संपलेल्या बिअरच्या बाटल्या विक्रीसाठी ठेवल्याचे आढळले. तसेच तासवडे येथील एमआयडीसीत विनापरवाना गूळ रिपॅकिंग कारखान्यातून सुमारे ३ लाख ६९ हजारांचा गूळ जप्त केला.

अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराड शहरालगत असलेल्या मलकापूर येथील हॉटेल्समध्ये बिअर बारमधून मुदत संपलेली शीतपेये तसेच बिअरची विक्री होत असल्याची तक्रार आली होती. तासवडे एमआयडीसीत विनापरवाना गुळाचे रिपॅकिंग होत असल्याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे डिजिटल पोर्टलवर प्राप्त झाली होती. त्यानुसार सहआयुक्त तुषार शिंगाडे यांच्यासह कराडच्या अन्न व औषध प्रशासकीय अधिकारी वंदना रूपनवर आणि कर्मचाऱ्यांनी मलकापुरात सहा हॉटेल्सवर छापा टाकला.

या छाप्यात दोन हॉटेल्समध्ये मुदत संपलेल्या शीतपेयांच्या बाटल्या आढळल्या. तपासणीनंतर दोन हॉटेल्स बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तर इतर चार हॉटेल्सची झडती घेतली. दरम्यान, कारवाई करण्यात आलेल्या हॉटेल्समधील बारमध्ये मुदत संपलेल्या बिअरच्या बाटल्या आढळून आल्या. त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मलकापुरातील कारवाईनंतर उंब्रज येथील तासवडे एमआयडीसीमध्ये छुप्या पद्धतीने विनापरवाना गुळाचे रिपॅकिंग केले जात होते. याठिकाणी छापा टाकून सुमारे ३ लाख ६९ हजारांचा गूळ तसेच इतर साहित्य जप्त केले.

हॉटेल्सवरील छाप्यांमुळे खळबळ

अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सातारा व कराड येथील अधिकाऱ्यांच्या वतीने मलकापूर शहर व परिसरात बुधवारी सहा हॉटेल्सवर छापा टाकला. यावेळी अधिकाऱ्यांनी हॉटेल्सची झडती घेतली. चालक आणि मालकांवर प्रश्नांची सरबत्ती केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, अनेक हॉटेल्समध्ये स्वच्छता आणि सुधारणा दिसत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गोडबोले ट्रस्टच्या वतीने येत्या रविवारी शिष्यवृत्ती प्रदान सोहळा - डाॅ. अच्युत गोडबोले यांची माहिती
पुढील बातमी
सातारा जिल्हा बँक निवडणूक: सहकारातील नव्या नियमामुळे १० दिग्गजांना ‘नो एन्ट्री’; २०११ ठरावांनंतर राजकीय घडामोडींना वेग

संबंधित बातम्या