फलटणमध्ये चायनीज मांजामुळे माजी सैनिक गंभीर जखमी; बंदी असतानाही मांजाची खुलेआम विक्री, आठवड्यात दोघे जखमी

by Team Satara Today | published on : 06 August 2026


फलटण : बंदी असलेल्या चायनीज मांजामुळे फलटण शहरात आठवड्यात आणखी एक गंभीर अपघात घडला. जाधववाडी (ता. फलटण) येथील माजी सैनिक शिवाजी मुगुटराव बुधावले हे डेक्कन चौक परिसरातून जाताना गळ्याला धारदार चायनीज मांजाने कापल्याने ते गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. ५) दुपारी घडली.

शासनाने चायनीज मांजाची विक्री आणि वापरावर बंदी घातलेली असतानाही फलटण शहरातील काही भागांत याची खुलेआम विक्री होत आहे. मात्र, याकडे संबंधित यंत्रणा आणि पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. कामानिमित्त फलटणमध्ये आलेले शिवाजी बुधावले हे दुचाकीवरून जाताना धारदार मांजाने त्यांच्या गळ्याला खोलवर जखम झाली. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील तरुणांनी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. आठवड्यात दुसरी दुर्घटना घडल्याने मांजा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

काही दिवसांपूर्वी दत्ता दादा जाधव (वय ४५, रा. कुरणेवाडी, ता. बारामती) हे कामानिमित्त फलटण शहरातील सोमवार पेठ परिसरातून दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर हवेत अडकलेला धारदार चायनीज मांजा त्यांच्या गळ्यात अडकला. त्या अपघातात त्यांच्या गळ्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी करंजे येथील एकावर गुन्हा
पुढील बातमी
माेलॅसीस लायसन्स काढून देतो, असे आमिष दाखवून एका तरुण व्यावसायिकाची ४ लाख ३८ हजारांची फसवणूक

संबंधित बातम्या