मुंबई : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा उल्लेख महाराष्ट्रकाँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' असा करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही या टीकेचे समर्थन केले. सुनेत्रा पवार यांनी ही टीका सकारात्मकपणे घ्यावी आणि आपण 'गुंगी गुडिया' नसून दुर्गा असल्याचे सिद्ध करून अर्थ खाते स्वत:कडे घ्यावे, असा सल्ला सपकाळ यांनी दिला. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. याचदरम्यान टीकेवर खुद्द सुनेत्रा पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आज दिवसभर सुनेत्रा पवार विविध कामांमध्ये व्यस्त होत्या. काँग्रेसकडून करण्यात आलेल्या टीकेवरून जेव्हा वातावरण तापले तेव्हा अखेर संध्याकाळी सुनेत्रा पवार यांनी यावर उत्तर दिले. मुंबईत सुनेत्रा पवार काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत होत्या. सभागृहातून बाहेर पडताना पत्रकारांनी सुनेत्रा पवार यांना यासंदर्भात प्रश्न विचारला. सुरुवातीला सुनेत्रा पवार काहीही उत्तर देण्यास इच्छुक दिसल्या नाहीत. पण पत्रकारांनी खूपच आग्रह धरल्यानंतर अखेर सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली. "मी वेळ आल्यानंतर उत्तर देईन.." अशी अतिशय सूचक प्रतिक्रिया देऊन सुनेत्रा पवार वाहनात बसून निघून गेल्या.