तीन अल्पवयीन मुलींच्या कथित अपहरणाचा बनाव मेढा पोलिसांनी केलेल्या तपासात उघड, भीतीपोटी अपहरणाची बनावट कहाणी रचल्याचे निष्पन्न

by Team Satara Today | published on : 05 August 2026


मेढा : जावली तालुक्यातील कुडाळ परिसरात तीन अल्पवयीन मुलींच्या कथित अपहरणाच्या घटनेने एकच खळबळ उडाली होती. भरदिवसा चार अज्ञात चोरट्यांनी पिकअप वाहनात जबरदस्तीने उचलून नेल्याचा दावा मुलींनी केल्याने पालकांसह पोलिसांचीही धावपळ उडाली. मात्र मेढा पोलिसांनी केलेल्या तपासात हा संपूर्ण प्रकार बनाव असल्याचे उघड झाले. घरातील मंडळी रागावतील आणि मार देतील या भीतीपोटी मुलींनी अपहरणाची बनावट कहाणी रचल्याचे निष्पन्न झाले.

कुडाळ परिसरात एका कॉलनीतील पाच, दहा आणि बारा वर्षांच्या तीन मुली खेळत असताना बराच वेळ घरी परतल्या नव्हत्या. घरी आल्यानंतर त्यांनी चार अनोळखी व्यक्तींनी तोंड दाबून पिकअप गाडीत टाकून आपले अपहरण केल्याची धक्कादायक माहिती पालकांना दिली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच मेढा पोलीस ठाण्याने तातडीने तपासाची चक्रे फिरवली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी मुलींची स्वतंत्रपणे चौकशी केली. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली तसेच मुलींनी सांगितलेल्या कथनाची पडताळणी करण्यात आली. मात्र चौकशीत मुलींच्या कथेत अनेक विसंगती आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी संयमाने आणि विश्वासात घेऊन विचारपूस केली असता संपूर्ण सत्य बाहेर आले.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तिन्ही मुली खेळण्यात इतक्या रमल्या की त्यांना वेळेचे भानच राहिले नाही. अंधार पडल्यावर त्या रस्ता चुकल्या आणि उशिराने घरी पोहोचल्या. घरी उशिरा आल्यामुळे पालक ओरडतील, मारतील या भीतीने त्यांनी अपहरणाची काल्पनिक कथा तयार करून सांगितली. त्यामुळे परिसरात निर्माण झालेली खळबळ अखेर पोलिसांच्या तपासामुळे शांत झाली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्हा बँकेचा गुलाल लावूनच सोलापुरात जाणार; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे वक्तव्य, राजकारणाचा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे
पुढील बातमी
खासगी वाटाघाटीतून जमीन देणाऱ्यांना मिळणार प्रकल्पग्रस्त दाखला : मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

संबंधित बातम्या