वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे यांचा स्तुत्य उपक्रम; पाच गरजू विद्यार्थ्यांना ५० हजार रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती

by Team Satara Today | published on : 05 August 2026


सातारा : आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वतःची एका महिन्याची ५० हजार रुपयांची पेन्शन समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देऊन राष्ट्रीय हॉकी प्रशिक्षक महेश खुटाळे यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

​कासार समाजातील अनेक कुटुंबांची बिकट आर्थिक परिस्थिती पाहता पैशाअभावी कोणत्याच विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, अशी महेश खुटाळे यांचे वडील कै. मधुकर कासार यांची इच्छा होती. वडिलांच्या याच स्मृती जपण्यासाठी त्यांनी आपल्या एका महिन्याच्या पेन्शनच्या ५० हजार रुपयांच्या निधीतून शैक्षणिक मदत देण्याचा निर्णय घेतला.

​या उपक्रमांतर्गत शिक्षणाची जिद्द असलेल्या मात्र आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या कासार समाजातील पाच गुणवंत विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील कु. श्रेया प्रवीण दोडे, अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील नान्नज येथील कु. साक्षी प्रशांत कोळपकर, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील म्हासुर्णे येथील समर्थ वैभव डोळ, पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथील कु. संपदा संजय अक्कर आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विडणी येथील चैतन्य प्रदीप कासार या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सामाजिक बांधिलकी जपणार्‍या या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र अभिनंदन होत असून इतर समाजातील नागरिकांनीही असा आदर्श घ्यावा, अशी भावना व्यक्त होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सेवानिवृत्तांनी अनुभवाची शिदोरी समाजाला द्यावी - यशेंद्र क्षीरसागर,श्रीमती स्मिता शिंदे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

संबंधित बातम्या