सातारा : रहिमतपूर पोलिसांनी सीईआयआर पोर्टलच्या मदतीने तब्बल 8 लाख 75 हजार रुपये किमतीचे 32 गहाळ स्मार्टफोन शोधून ते त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल हरवल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला विशेष शोधमोहीम राबविण्याचे निर्देश दिले. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली.
गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीईआयआर पोर्टलचा वापर करून महाराष्ट्रासह परराज्यातील विविध ठिकाणी वापरात असलेल्या गहाळ मोबाईलचा माग काढला. संबंधित मोबाईलधारकांशी संपर्क साधत तांत्रिक तपास आणि सातत्यपूर्ण समन्वयातून सर्व 32 मोबाईल हस्तगत करण्यात आले. त्यानंतर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले.
हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी रहिमतपूर पोलीस आणि सातारा जिल्हा पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यातही गहाळ मोबाईल शोधण्यासाठी अशीच विशेष मोहीम सातत्याने राबविण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद नेवसे यांनी दिली.
या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण बर्गे तसेच पोलीस कॉन्स्टेबल तुषार काळंगे, अमर चव्हाण आणि अमर भोसले यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.