पाटण : संकटाच्या काळात समाज एकत्र येऊन कसा उपयोगी पडतो, याचा प्रत्यय तारळे विभागात घडलेल्या घटनेतून आला. समाज माणुसकीचे दर्शन कसे घडवू शकतो, याचे उत्तम उदाहरण तेथे पाहावयास मिळाले. बोर्गेवाडी (ता. पाटण) येथे घडलेल्या एका घटनेत विजेच्या धक्क्याने बैलजोडी गमावलेल्या शेतकऱ्यास केदारनाथ युवा प्रतिष्ठानने समाज माध्यमावर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विविध समाज घटकांनी केलेल्या मदतीमुळे नवीन बैलजोडी मिळाली.
बोर्गेवाडी येथे ऐन शेतीच्या हंगामात विजेच्या धक्क्याने आपली बैलजोडी गमावलेल्या एका गरीब शेतकऱ्याला मदत मिळावी, म्हणून श्री केदारनाथ युवा प्रतिष्ठानने समाज माध्यमावर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत उभ्या राहिलेल्या मदतीतून अवघ्या २४ तासांत शेतकऱ्याला नवीन बैलजोडी मिळाली.
काही दिवसांपूर्वी बोर्गेवाडी येथील अल्पभूधारक शेतकरी यशवंत किसन बोर्गे यांच्या बैलजोडीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. ऐन शेतीच्या हंगामात संसाराचा आणि शेतीचा कणा मोडल्यामुळे बोर्गे कुटुंबीयांवर आभाळ कोसळले होते. हतबल झालेल्या या कुटुंबाला काय करावे हे सूचत नव्हते. या दुःखाच्या प्रसंगी फडतरवाडी येथील श्री केदारनाथ युवा प्रतिष्ठानने समाज माध्यमावर आणि प्रत्यक्ष संपर्काच्या माध्यमातून नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. त्यास प्रतिसाद देत समाजातील सर्वच स्तरांतून मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले.
विशेष म्हणजे अवघ्या २४ तासांच्या आत नवीन बैलजोडीसाठी लागणारा संपूर्ण आर्थिक निधी जमा झाला. यशवंत बोर्गे यांनी त्यातून स्वतःच्या पसंतीने एक लाख १५ हजारांची नवीन बैलजोडी खरेदी करून बेंदूर सण साजरा केला. श्री केदारनाथ युवा प्रतिष्ठानने केलेल्या आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद दिला. लोकांनी केलेल्या मदतीमुळे बोर्गे कुटुंबीयांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. माणुसकी आणि जिव्हाळा अजूनही जिवंत आहे, याचीच जणू प्रचिती या घटनेने आली. प्रतिष्ठानच्या या स्तुत्य उपक्रबाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.