लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षे अत्याचार; पाटण येथील खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकाला अटक, पोलिसात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 04 August 2026


पाटण : मला तू खूप आवडतेस, मी माझ्या बायकोला सोडून तुझ्याशी लग्न करणार आहे, असे आमिष दाखवून चार वर्षे वारंवार अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पाटण येथील खासगी शिक्षण संस्थेतील शिक्षकाविरुद्ध पाटण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. 

राजेंद्र तुकाराम बनसोडे (रा. पाटण) असे त्‍या शिक्षकाचे नाव असून, पाटण पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध कलम (६९) (११५/२)(३५१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्‍या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी संशयिताबरोबर फिर्यादी महिलेची ओळख झाली होती.

त्यानंतर त्‍याने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, संबंधित शिक्षक हा पाटणमधील खासगी शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत असून, पीडित महिलेला एका कंपनीत नोकरी लावतो म्हणून तिच्‍या आर्थिक परिस्थितीचा त्‍याने वारंवार गैरफायदा घेतला. सुरुवातीला पीडितेने परिस्‍थितीमुळे त्‍याच्‍याकडे दुर्लक्ष केले. 

मात्र, त्‍यानंतर त्‍याने २०२२ मध्‍ये तिच्‍या घरी येऊन लग्‍नाच्‍या आमिषाने तिच्या इच्छेविरुद्ध संबंध प्रस्‍थापित केले. त्यावेळी पीडितेने त्याला नकार दिला असता त्याने कामावरून काढून टाकण्याची तसेच याबाबत कोणाला सांगितले तर तुला माझ्या गाडीने उडवून ठार करेन, अशी धमकी दिली.

भीतीपोटी संबंधित पीडिता कोणालाही काही बोलली नाही. त्याचाच गैरफायदा घेऊन त्याने एका हेल्थ केअर कंपनीचे काम तांबवे भागात करावयाचे आहे असे सांगून तांबवे फाटा, कऱ्हाड, पाटण रोड येथे खोली भाड्याने घेऊन तेथे राहण्यास सांगून ३० मे २०२३ ते १३ जून २०२४ पर्यंत वारंवार अत्याचार केले. 

त्यानंतर संशयिताने कंपनीचे काम मल्हारपेठ (ता. पाटण) विभागात करावयाचे आहे, असे सांगून पुन्हा ता. ७ जुलै २०२४ पासून मल्हारपेठ (ता. पाटण) येथे तिला एक खोली भाड्याने घेऊन दिली होती. याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक सुदाम पाचोरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश तारू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बी. बी. चव्हाण तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला; पाण्याची आवक घटली, धरणात सध्या 92.49 टीएमसी पाणीसाठा
पुढील बातमी
विविध समाज घटकांनी केलेल्या मदतीमुळे शेतकऱ्यास नवीन बैलजोडी मिळाली; केदारनाथ युवा प्रतिष्ठानने समाज माध्यमावर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद

संबंधित बातम्या