मुंबई : राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अधिकृत अकाऊंटवरून गुंगी गुडिया असा उल्लेख करण्यात आल्याने वादाला तोंड फुटले आहे. तसेच काँग्रेसकडून करण्यात आलेल्या टीकेविरोधात अजित पवार गटाकडून तीव्र आंदोलन केलं जात आहे. मात्र सुनेत्रा पवारांवर केलेल्या या टीकेमुळे वातावरण तापलं असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मात्र या टीकेचं समर्थन केलं असून, सुनेत्रा पवार यांनी ही टीका सकारात्मकपणे घ्यावी आणि आपण गुंगी गुडिया नाही आहोत हे सिद्ध करून दाखवावं, असा सल्ला दिला आहे.
पक्षाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सुनेत्रा पवार यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेचं समर्थन करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पत्रकारांनी प्रश्न विचारले पाहिजेत, तसेच नेत्यांनी त्यांची उत्तरं दिली पाहिजेत. समाजकारणात, राजकारणात आपल्यावर आरोप होत असतील तर त्याचीही उत्तरं दिली गेली पाहिजेत. मात्र काँग्रेस पक्षाने ज्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं हे ट्विट केलं, त्यामध्ये त्यात पत्रकार प्रश्न विचारत आहेत आणि ज्यांच्यावर अनेक आरोप आहेत अशी व्यक्ती पत्रकारांना गप्प बसवताना दिसत आहे. अशावेळेस उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार ह्या एक शब्दही बोलताना दिसत नाही आहेत. त्यामुळे यातील मूळ मुद्दा हा त्यांच्या वर्तनाचा आहे. उपमुख्यमंत्रीपदावरील व्यक्ती पत्रकारांचे प्रश्न घेत नाही. तसेच एका वादग्रस्त व्यक्तीकडून पत्रकारांना गप्प बसवतात, हे लोकशाहीला आणि समाजजीवनाला अशोभनीय आहे. त्या अनुषंगाने गुंगी गुडिया हा शब्द प्रयोग केला आहे, असे त्यांनी सांगितले.
हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, गुंगी गुडिया हा अपशब्द आहे का, गुंगी गुडिया ही शिवी आहे का, गुंगी गुडिया हा असंसदीय शब्द आहे का? तर हे वर्णन आहे. तसेच या शब्दात जे वर्णन आहे त्याच प्रमाणे तो शब्द उपमुख्यमंत्र्यांना लागू होत आहे. सुनेत्रा पवार ह्या अजितदादांच्या विमानाला झालेल्या अपघातापासून अनेक विषयांवर बोलत नाही. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी टीकेला समजून घ्यावं. त्यावरून गोंधळ घालण्याची किंवा आम्हाला शहाणपणा शिकवण्याची आवश्यकता नाही. होणाऱ्या टीकेकडे सकारात्मकपणे पाहिलं पाहिजे. इंदिरा गांधी यांनाही गुंगी गुडिया म्हटले जायचे. मात्र आपण गुंगी गुडिया नाहीत हे त्यांनी दाखवून दिले. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनीही विविध प्रश्नांवर आपलं मत मांडून, राज्य सरकारमध्ये अर्थ मंत्रालय मिळवून आपण गुंगी गुडिया नाही, हे दाखवून द्यावे असं आव्हानही हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले.