सातारा : नैसर्गिक आपत्ती, कीड, रोग इ. कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास शेतक-याचे स्थैर्य अबाधित राखणेसाठी शासनाने खरीप हंगाम २०२६ साठी पंतप्रधान फसल बीमा योजना पुढे सुरु ठेवणेस मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेत सहभागी होणेचे आवाहन कृषि विभागामार्फत करणेत येत आहे.
तथापि सदर योजनेत शेतक-यांनी सहभागी होणेची अंतिम मुदत दि. ३१ जूलै २०२६ अशी होती. तथापि, राज्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत कमी सहभाग, शेतक-यांकडे अॅग्रीस्टेंक अंतर्गत फार्मर आयडी नसणे, PMFEIY Portal मधील व्यत्यय, आधार व CSC सर्व्हरवरील व्यत्यय, राज्याच्या भूमि अभिलेख पोर्टलच्या तांत्रिक ससेवेतील व्यत्यय इ. मुळे शेतक-यांचा योजनेतील सहभागावर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र शासनाने योजनेत सहभागी होणेसाठी शेतक-यांना विशेष बाब म्हणून १० ऑगस्ट २०२६ अखेर मुदतवाढीस मान्यता दिली आहे.
जिल्ह्यातील भात, ख. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन व ख. कांदा या १० पीकांसाठी अधिसूचित महसूल मंडळांमध्ये ही योजना राबविणेत येत असून सद्यस्थितीतील अल-निनोच्या पार्श्वभूमिवर अनिश्क्षित हवामानामुळे पीकांच्या वाढीवर व पर्यायने उत्पन्नावर परिणाम होणार असल्याने शेतक-यांना पीक विमा योजनेची अत्यंत आवश्यकता आहे. असे असूनही आजअखेरचा अहवाल पाहता योजनेत शेतक-यांचा सहभाग कमी असल्याचे दिसून येत आहे. अतिशय अल्प दरामध्ये ही योजना शासनाने सुरु केली असून ती शेतक-यांच्या हिताची असल्याने शेतक-यानी वाढीव मुदतवाढीच्या कालावधीत तात्काळ आपला विमा हप्ता भरुन योजनेत सहभागी होणेचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अजय शेंडे यांनी केले आहे.