सातारा : राज्यात विक्री व वाहतुकीस बंदी असलेला गुटखा चिरमुर्यांच्या पोत्यांआड लपवून ट्रकमधून पुण्याच्या दिशेने नेला जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने धाडसी कारवाई करत मोठा साठा जप्त केला. या कारवाईत 17 लाख 65 हजार 940 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखू, तसेच 7 लाख 50 हजार रुपयांचा ट्रक असा एकूण 25 लाख 15 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मच्ंिछद्र आकाराम कांबळे (वय 54, रा. बुधगाव, ता. मिरज, जि. सांगली) असे ताब्यात घेण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी जिल्ह्यात प्रतिबंधित गुटख्याच्या अवैध वाहतूक व विक्रीविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक कार्यरत होते.
विश्वसनीय माहितीच्या आधारे सांगलीकडून पुण्याकडे जाणारा एमएच-10-झेड-4696 क्रमांकाचा ट्रक नागठाणे (ता. सातारा) येथील राष्ट्रीय महामार्गावरील पुलाजवळ अडविण्यात आला. ट्रकमधील दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी वाहनात पानमसाला असल्याचे सांगितले. मात्र सखोल तपासणीदरम्यान चिरमुर्यांच्या पोत्यांच्या आड मोठ्या प्रमाणात विमल पानमसाला आणि तंबाखूचा प्रतिबंधित साठा लपवून ठेवलेला आढळून आला.
घटनेची माहिती अन्न सुरक्षा विभागाला देण्यात आल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी रुपाली खापणे घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्या उपस्थितीत प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात संबंधिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अन्न सुरक्षा व मानके अधिनियम अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, बोरगाव पो.स्टे. स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि रोहित फार्णे, मच्छिंद्रनाथ पाटील, पोलीस अंमलदार आतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, अमित झेंडे, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, सुजित भोसले, अमित सपकाळ, स्वप्नील शिंदे, अरुण पाटील, स्वप्नील कुंभार, किरण जगताप, लैलेश फडतरे, ओंकार यादव, अमित माने, मोहन पवार, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, तसेच बोरगाव पोलीस ठाणेचे दिपकुमार मांढवे, निलेश गायकवाड, सुनिल कर्णे, जगदीश कणसे, विशाल जाधव, धीरज महाडीक, ज्ञानेश ढाणे, केतन जाधव व अमोल कणसे यांनी सहभाग घेतला.