दिल्ली : संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या बांकीपुर विधानसभा मतदातसंघातील पोटनिवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी भाजपाला दणका देत सनसनाटी विजय मिळवला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या नितीन नवीन यांच्या परंपरागत मतदारसंघात मतमोजणीच्या सुरुवातीपासून आघाडी घेणाऱ्या प्रशांत किशोर यांनी अखेरीस भाजपाचे उमेदवार निरज कुमार यांच्यावर १९ हजारांहून अधिक मतांचं मताधिक्य घेत विजय मिळवला आहे.
भाजपासाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरत रंगत आणली होती. तसेच प्रशांत किशोर यांच्या उमेदवारीमुळे भाजपा, राजद आणि जनसुराज्य यांच्यात येथे तिरंगी लढत झाली. बांकीपूरमध्ये ३० जुलै रोजी मतदान झाले होते. मात्र मतदानाची टक्केवारी फारच कमी राहिल्याने कमी मतदानाचा कुणाला फायदा होईल, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
दरम्यान, आज झालेल्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच प्रशांत किशोर यांनी आघाडी मिळवली. मतमोजणीदरम्यान, एखाद दुसरी फेरी वगळता प्रत्येक फेरीत प्रशांत किशोर यांचं मताधिक्य सातत्याने वाढत गेलं. त्यामुळे भाजपाचे उमेदवार निरज कुमार यांचा पराभव निश्चित झाला. दरम्यान, ३२ व्या फेरीअखेर प्रशांत किशोर यांनी आपली आघाडी १९ हजारांहून अधिक वाढवत आपला विजय निश्चित केला.
भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणलेले लाडू वाया
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा बालेकिल्ला आणि गेल्या अनेक वर्षांपासून ताब्यात असलेला मतदारसंघ असल्याने बांकिपूरमध्ये आपला उमेदवार विजयी होईल याची भाजपाला खात्री होती. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मतमोजणीआधीच विजयी जल्लोषाची तयारी केली होती. त्यासाठी लाडूची ऑर्डरही देण्यात आली होती. मात्र मतदारांनी भाजपाविरोधात कौल दिल्याने भाजपाचा विजय साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मागवलेले लाडू वाया गेले.