सातारा : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आगमन सोहळ्यात डीजेला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मंडळांनी डीजेमुक्त उत्सव साजरा करतानाच शांतता व नियमांचे पालन करावे, अशा सूचना पोलिस प्रशासनाकडून देण्यात आल्या. दरम्यान, गणेश मंडळांनी केलेल्या मागणीनुसार आगमन सोहळ्याच्या मिरवणुकांसाठी पाच दिवसांची मुभा देण्याबाबत प्रशासनाने सकारात्मकता दर्शविली.
साताऱ्यातील पोलिस करमणूक केंद्रात शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि पोलिस प्रशासनाची संयुक्त बैठक पार पडली. उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे, पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे, सहायक पोलिस निरीक्षक राजेश माने आदींसह गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
समिती निश्चित करणार तारखा..
येत्या काही दिवसांत गणेशोत्सव समिती आणि गणेश मंडळांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत गणेश आगमन मिरवणुकीसाठी तारखा निश्चित करून त्या पोलिस प्रशासनाकडे पाठविल्या जाणार आहेत. त्याच तारखांना शहरातील मंडळांकडून गणेश आगमन मिरवणुका काढल्या जातील.
बैठकीत या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा
- ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी आगमन मिरवणुकीत डीजेचा वापर टाळणे
- गणेशोत्सवापूर्वी मंडळांना आगमन सोहळ्यासाठी पाच दिवसांची मुभा द्यावी
- शहर परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये, याचे नियोजन करणे
- उत्सव काळात सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे
परंपरा जपून सामाजिक सलोखा जपावा
बैठकीदरम्यान सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष महेश साळुंखे आणि उपाध्यक्ष अभिजीत बारटक्के यांनी मंडळांना पोलिस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच शहराची परंपरा जपून सामाजिक सलोखा आणि शिस्त राखत गणेशोत्सव साजरा करण्याची विनंती केली. या बैठकीला किरण खरात, संदीप शिंदे, सौरभ सुपेकर, अजिंक्य कदम, अर्जुन मोने, सुनील परदेशी आदींसह मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.